कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन, मुंबई शिक्षण उपसंचालकांवर कारवाईची मागणी

मुंबईचे शिक्षण उपसंचालक आणि त्यांच्या कार्यालयातील अनियमितता आणि भ्रष्टाचाराविरोधात मुंबई विभागातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर जिह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आझाद मैदानात शुक्रवारी 2 मे रोजी धरणे आंदोलन करणार आहेत.

संचालकांची चौकशी करून दोषींवर उचित कारवाई करावी, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. गेल्या बुधवारी शिक्षकांनी शिक्षण मंडळ कार्यालयावर मोर्चा नेला होता व कारवाईसाठी बोर्डाचे अध्यक्ष अहिरे यांना निवेदन दिले होते. मात्र शिक्षक यावर समाधानी नसून त्यांनी हे आंदोलन करायचे ठरवले आहे.

मुंबईचे उपसंचालक संदीप संगवे यांच्या कार्यात कोणतीही सुधारणा केली नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

संचमान्यतेतील निकषात बदल मान्य करूनही त्यांनी एकाही कॉलेजला संचमान्यता सुधारून दिली नाही, शिक्षक समस्यांचे निराकरण केले नाही. शिक्षकांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बनविलेल्या नियमावलीचे, शाळा संहितेचे पालन केले नाही, कार्यभार मोजताना शिक्षण मंडळाने विषयासाठी निर्धारित केलेल्या तासिका मोजल्या नाहीत, विद्यार्थी संख्या योग्यरित्या धरली नाही व शिक्षक संख्या कमी केली, त्यांना अतिरिक्त केले किंवा सेवेतून कमी केले. तुकडय़ा कमी केल्या, थकीत वेतन देयके वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवली इत्यादी आरोप शिक्षकांनी संगवे यांच्यावर केले आहेत.