
मुंबईचे शिक्षण उपसंचालक व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयीन अनियमितता, प्रलंबित कार्य व भ्रष्टाचाराबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी यासाठी मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, रायगड, पालघर जिह्यातील सुमारे 400 कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी मोर्चा काढला.
शिक्षकांनी वाशी येथील मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांना कारवाईसाठी निवेदन दिले. पुढील कारवाईसाठी हे निवेदन शिक्षण आयुक्तांना पाठवण्यात येईल व कारभारात निश्चित सुधारणा होईल असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने मुंबईचे शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांना वारंवार सांगूनही शिक्षक समस्यांचे निराकरण न केल्यामुळे हे आंदोलन करणे संघटनेला भाग पडले, असे संघटनेचे सरचिटणीस प्रा. मुपुंद आंधळकर यांनी सांगितले. निवेदन देताना प्रा. अमर सिंह, प्रा. प्रकाश दीक्षित, प्रा. सुनील पूर्णपात्रे, प्रा. मणीवन्नन, प्रा. सुरेश अहिरे, प्रा. भानुदास बिरादार, प्रा. रवींद्र भदाणे आदी उपस्थित होते.