
मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अनियमितता, प्रलंबित कामे व भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, यासाठी मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड, पालघर जिह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक बुधवारी 16 एप्रिलला आंदोलन करणार आहेत. या दिवशी सामूहिक रजा घेऊन दुपारी 2 वाजता वाशी स्टेशनहून मोर्चाने जाऊन मुंबई विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांना कारवाईसाठी निवेदन देणार आहेत.
मुंबई कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेने वारंवार शिक्षण उपसंचालकांची भेट घेऊन त्यांच्याकडे शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली, परंतु समस्या सुटत नसल्यामुळे शिक्षक त्रस्त झाले आहेत. सेवेतील शिक्षकांना कमी करून नवीन शिक्षकाला नियुक्ती दिली जात आहे. त्याबाबत तक्रारी करूनही कारवाई केली जात नाही. शिक्षकांच्या समस्या न सोडवता मुंबईतील शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून अनियमिततेला, शिक्षकांच्या सेवा मुक्तीला प्रोत्साहन दिले जाते आहे. चुकीच्या संच मान्यता करीत शिक्षकांची संख्या कमी करणे, सेवेतील शिक्षकाला त्याचे उचित लाभ न देणे, लाभ देताना आर्थिक गैरव्यवहार करणे, यामुळे शिक्षक वर्गात प्रचंड असंतोष आहे, अशी प्रतिक्रिया संघटनेचे सरचिटणीस प्रा. मुपुंद आंधळकर यांनी दिली. याविरोधात शिक्षक दुपारी 3 वाजता वाशी स्टेशनहून मोर्चाने जाऊन शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांना दोषींवर कारवाई करण्यासाठी निवेदन देणार आहेत.
शिक्षकांच्या मागण्या
n अनियमितता, समस्या सोडवणुकीसाठी होणारा विलंब, अल्पसंख्याक संस्थांमधील भरती यातील भ्रष्टाचार दूर करावा. n सर्व प्रलंबित नियुक्ती मान्यता तातडीने द्यावी. n नियम डावलून केलेल्या सर्व संचमान्यता सुधाराव्यात. n सर्व प्रलंबित वेतनदेयके विनाविलंब मंजूर करावीत. n सर्व जिह्यांतील शिक्षकांचे पगार दरमहा एक तारखेला व्हावेत.