न्यायाधीशांची खोटी स्वाक्षरी करून बनावट दस्तावेज तयार करण्याचा कारनामा न्यायालयातील एका लिपिकाने केला आहे. त्याने बनावट स्वाक्षरी आणि बनावट शिक्के वापरून वारस दाखले तयार केले आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी दीपक फड याला अटक केली आहे.
पनवेल परिसरात वास्तव्य करणाऱ्या एका व्यक्तीने वारस दाखला मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. हे दिवाणी चौकशी अर्ज प्रकरण सहदिवाणी न्यायाधीश ‘क’ स्तर पनवेल यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे. याबाबत कोणतेही आदेश न्यायालयाने दिले नाहीत. मात्र नकलेच्या अर्जावरील आदेशावर दिवाणी न्यायाधीशांची सही असल्याचे दिसत असल्याने याबाबत शहानिशा केली असता सदर आदेशावर असलेली सही त्यांची नसल्याचे उघडकीस आले. त्यानंतर संगणकीय प्रणालीमधील सीआयएसमध्ये पडताळणी केली असता हे प्रकरण संगणकीय प्रणालीमधून डिलीट केल्याचे दिसून आले. त्यामुळे अज्ञात इसमाने नक्कल मिळणेबाबतच्या दस्तऐवज पडताळणीकरिता पिठासीन अधिकाऱ्यांच्या खोट्या आदेशान्वये खोटे नोंद पुस्तक क्रमांक देऊन न्यायालयीन अभिलेख तयार केला आणि बनावट नक्कल अभिलेखावर न्यायाधीशांची खोटी सही केल्याचे उघड झाले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चौकशी केली असता दीपक फड हा लिपिक दोषी आढळून आला. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
आणखी किती दाखले तयार केले?
गुप्ता नावाच्या एका नागरिकाने वारस दाखल्यासाठी अर्ज केला होता. त्याचा दाखला तयार करण्यासाठी फड याने हा कारनामा केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर न्यायालयाची यंत्रणा सतर्क झाली आहे. फड याने याच पद्धतीने आणखी किती दाखले तयार केले आहेत, दाखल्यांबरोबर अन्य काही बनावट दस्तावेज त्याने बनवले आहेत का, याचाही पोलीस कसून तपास करीत आहेत.