
जुहू येथे एका मराठी दांपत्यावर परप्रांतीय महिलेने शिवीगाळ करीत प्राणघातक हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली. नीतू पांडे असे त्या महिलेचे नाव असून तिने फरशीचा तुकडा दोघांच्या डोक्यात मारला. यात निकम दांपत्य जखमी झाले. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात नीतू व तिच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुहूच्या एस.एन. मार्गावरील गॉडगिफ्ट इमारतीत अमृत निकम हे त्यांची पत्नी व दोन मुलांसोबत राहतात. तर त्यांच्याच शेजारी नीतू व सिमरन पांडे या दोघी त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. शुक्रवारी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास निकम हे कामावरून घरी परतले व इमारतीजवळ असलेल्या गल्लीत त्यांची दुचाकी लावत होते. त्या वेळी सिमरन व नीतू पांडे या शिव्यांची लाखोली वाहत निकम यांच्या अंगावर धावून गेल्या. पूर्वीच्या रागाच्या कारणावरून हुज्जत घालत नीतू हिने तेथे पडलेला फरशीचा तुकडा उचलून निकम यांच्या डोक्यात मारला. मग तेथून दोघी इमारतीत गेल्या आणि पतीला मारहाण होतेय म्हणून धावत खाली आलेल्या निकम यांच्या पत्नीच्या डोक्यातदेखील नीतूने त्या फरशीच्या तुकडय़ाने मारहाण केली. यात दोघेही जखमी झाले. दोघांनाही तेथून तत्काळ कुपर इस्पितळात नेण्यात आले. या प्रकरणी निकम यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिमरन व नीतू पांडे या दोघींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.