
इंडियन प्रीमियर लीगच्या अठराव्या हंगामाला सुरुवात झाली असून पहिलाच सामना गतविजेच्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात रंगला. ईडन गार्डन्सवर रंगलेल्या या लढतीत कोलकाता संघाला पराभवाची चव चाखावी लागली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाताला बंगळुरूकडून 7 विकेट्सने मात मिळाली. या पराभवानंतर कोलकाताचा सह-मालक शाहरूख खान चांगलाच नाराज झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
शाहरूखसह या संघाची सह-मालकीण अभिनेत्री जुही चावला आहे.या संघाने 2012, 2014 आणि 2024 मध्ये विजेतेपद पटकावले आहे. त्याआधी संघाची कामगिरी यथातथाच होत होती. याला टीमची काळी जर्सी कारणीभूत असल्याची अंधश्रद्धा जुही चावला हिची होती. जुही चावला हिचा पती आणि केकेआरचा सह-मालक जय मेहता याने ‘लिव्हिंग विद केकेआर’ या आपल्या डॉक्युमेंटरीमध्ये याचा खुलासा केला आहे.
दक्षिण आफ्रिकेमध्ये केकेआर संघाचा दारुण पराभव झाला होता. या पराभवानंतर आम्ही परत येत असताना अचानक जुही चावला मला म्हणाली की, काळा रंग आपल्यासाठी अशुभ आहे आणि त्यामुळे पराभव होत आहे. ही बाब शाहरुखनेही ऐकली आणि त्याने यावर काय नॉनसेन्सपणा आहे? अशी प्रतिक्रिया जुहीला दिली, असे जय मेहता यांनी सांगितले.
डॉक्युमेंटरीमध्ये जुही चावला हिनेही काळ्या रंगावर टिप्पणी केली असून आपल्या मनात नक्की काय अंधश्रद्धा आहे हे देखील सांगितले. काळ्या रंगाबाबत मी खुप अंधश्रद्धाळू आहे. काळा रंग केकेआरसाठी अशुभ असून या रंगामुळे संघात ऊर्जा संचारत नाही, असे मला वाटायचे. जेव्हा कामगिरी अगदीच सुमार झाली तेव्हा मी यावर आक्षेप घेतला आणि काळा रंग बदलण्यास सांगितले. त्यामुळे काळा रंग बदलून जांभळा करण्यात आला, असे जुही चावला म्हणाली.
याआधीही जुही चावला हिने काळ्या आणि सोनेरी रंगाची जर्सी आपल्याला आवडली नव्हती असे सांगितले होते. ‘गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’च्या एका कार्यक्रमात तिने याबाबत विधान केले होते. मला क्रिकेट फ्रेंचायझीबाबत काहीही माहिती नव्हते. फेंचायझी कशी चालवायची याचीही माहिती नव्हती. त्यामुळे मी शाहरूखच्या घरी बैठकीला जात होते. जिंगलपासून ते जर्सीपर्यंत सर्वकाही निर्णय घरीच व्हायचे. काळ्या आणि सोनेरी रंगाचा पर्याय शाहरूखनेच दिला होता, पण मी काळ्या रंगामुळे खूश नव्हते, असे जुहीने सांगितले होते.
Who is Vipraj Nigam – आयपीएलमध्ये लखनऊविरुद्ध ‘भौकाल’ उडवणारा विपराज निगम कोण आहे?