चंद्रचूड म्हणतात… न्यायाधीशाने नास्तिक असण्याची गरज नाही!

सर्व धर्मांप्रती निष्पक्ष राहण्यासाठी न्यायाधीशाने नास्तिक असण्याची गरज नाही, असे मत देशाचे माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी गुरुवारी व्यक्त केले. मी धार्मिक आहे हे नाकारत नाही. माझा धर्म मला सर्वधर्म समभावाची शिकवण देतो, असे ते म्हणाले. ‘बीबीसी’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सरन्यायाधीश पदाच्या कार्यकालातील विविध मुद्दयांवर मते मांडली.

अयोध्येतील राम मंदिराचा ऐतिहासिक निकाल जाहीर करण्यापूर्वी देवापुढे प्रार्थना करण्यासाठी बसल्याच्या वृत्ताचा डॉ. चंद्रचूड यांनी इन्कार केला. ही गोष्ट पूर्णत: चुकीची आहे. ही सोशल मीडियावर पसरवलेली गोष्ट आहे. तुम्ही केवळ सोशल मीडिया पाहिलात व त्यावर विश्वास ठेवून न्यायाधीशांनी काय म्हटलेय, याचे उत्तर शोधाल तर तुम्हाला कदाचित चुकीचे उत्तर मिळेल. राम मंदिरचा निकाल देण्यापूर्वी मी कोणत्या स्थितीत होतो, याचे चित्र चुकीच्या पद्धतीने माध्यमांमध्ये पसरवले गेले, असे डॉ. चंद्रचूड यांनी स्पष्ट केले.

मी पुनरुचार करेन की लोकशाहीत न्यायपालिकेची भूमिका संसदेतील विरोधकांसारखी नाही. आम्ही इथे कायद्याला धरून काम करण्यासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी बांधील असतो, असेही त्यांनी नमूद केले. बीबीसीचे ज्येष्ठ पत्रकार स्टफीन सॅकूर यांनी घेतलेल्या हार्डटॉक मुलाखतीत त्यांनी विविध मुद्यांवर स्पष्ट मते व्यक्त केली. राम मंदिराव्यतिरिक्त जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना जामीन, सीएए, न्यायव्यवस्थेतील स्त्री-पुरुष प्रमाण तसेच गणेशोत्सव काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट आदी मुद्द्यांवर त्यांनी आपली मते मांडली. संवैधानिक पदावरील व्यक्तींमध्ये जो शिष्टाचार होतो, त्याचा न्यायालयीन प्रकरणांशी काहीही संबंध नसतो, असे उत्तर त्यांनी पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीबाबतच्या प्रश्नावर दिले.