लाचखोरीच्या आरोपातील न्यायाधीशाची हायकोर्टात धाव, अटकपूर्व जामिनासाठी मागितली दाद

लाचखोरीच्या गुह्यात आरोपी असलेल्या एका सत्र न्यायाधीशाने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांनी फसवणूक प्रकरणात जामीन मंजूर करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. उच्च न्यायालय 15 जानेवारीला त्याच्या अर्जावर सुनावणी घेणार आहे.

न्यायाधीश धनंजय निकम यांच्यातर्फे अॅड. विरेश पुरवंत यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जाची न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या एकलपीठाने बुधवारी दखल घेतली. तथापि, आरोपी न्यायाधीश असल्यामुळे अटकपूर्व जामीन अर्जावर चेंबरमध्ये सुनावणी घेतली जाईल व त्या सुनावणीमध्ये एका न्यायिक अधिकाऱयाचा समावेश असेल, असे न्यायमूर्ती बोरकर यांनी स्पष्ट केले. न्यायाधीश निकम हे या प्रकरणात निर्दोष असून त्यांना नाहक गोवण्यात आले आहे. निकम यांनी कुठल्याही प्रकारे पैशांची मागणी केलेली नाही किंवा लाचेचे पैसे स्वीकारलेले नाहीत, असा युक्तिवाद अॅड. पुरवंत यांनी केला.