
जेएसडब्लू इंडियन ओपन स्क्वॉश स्पर्धेत राष्ट्रीय क्रमवारीतील अव्वल मानांकित अनाहत सिंग, अभय सिंग या हिंदुस्थानी खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला. हिंदुस्थानात सुरू असलेल्या पहिल्या वहिल्या पीएसए स्क्वॉश कॉपर स्पर्धेतील आजच्या पहिल्या दोन्ही उपांत्य लढती बॉम्बे जिमखाना येथील हिरवळीवर उभारण्यात आलेल्या ग्लास कोर्टवर पार पडल्या.
बॉम्बे जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महिला गटात उपांत्य फेरीत पहिल्या लढतीत हिंदुस्थानची युवा खेळाडू अनाहत सिंगने अनुभवी खेळाडू जोशना चिनप्पावर धक्कादायक विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. 38वर्षीय अनुभवी जोशनाने पहिला सेट गमावल्यानंतर आपला अनुभव पणाला लावताना 1-1 अशी बरोबरी साधली. परंतु अनाहत हिने पुढच्या दोन गेममध्ये कोर्टच्या चारही कोपऱ्यांमध्ये अचून फटके मारत जोशनाला निष्प्रभ केले. अनाहत हिने हा सामना 32 मिनिटात 11-07, 05-11, 11-06, 11-06 अशा फरकाने जिंकून अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
पुरुष गटातील पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अभय सिंगने इजिप्तचा अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडू करीम एल हमामी याच्यावर 55 मिनिटांच्या कडव्या झुंजीनंतर 11-04, 11-06, 06-11, 11-06 असा विजय मिळवला केला. फॉर्ममध्ये असलेल्या अभय सिंगने सलग दोन सेट सहज जिंकून 2-0अशी आघाडी घेतली. करीमने तिसरा सेट जिंकताना सामन्यात रंगत आणली आणि चौथ्या सेटमध्ये ही आघाडी घेतली. परंतु अभय सिंगने जोरदार कमबॅक करत चौथा सेट जिंकून अंतिम फेरी गाठली.