मुंबईतील युवा खेळाडूंसाठी स्फूर्तिस्थान असलेल्या ‘ज्युनियर मुंबई श्री’चे प्रोत्साहित करणारे आयोजन येत्या सोमवार, 8 जानेवारीला केले जाणार आहे. या स्पर्धेबरोबर ‘मास्टर्स मुंबई श्री’, ‘दिव्यांग मुंबई श्री’ आणि ‘ज्युनियर मुंबई श्री’, ‘मेन्स फिजिक फिटनेस’ या स्पर्धांही रंगणार आहेत. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटनेच्या मान्यतेने होणारी स्पर्धा कांदिवली पश्चिमेला शाम सत्संग भवन, आदर्श नगर, एकता नगर क्रॉस रोडला आयोजित केली जाणार आहे.
‘नवोदित मुंबई श्री’ होताच मुंबईकर शरीरसौष्ठवपटूंना वेध लागतात ते ‘ज्युनियर मुंबई श्री’चे. मुंबई शरीरसौष्ठवातील भावी तारे ‘ज्युनियर मुंबई श्री’ स्पर्धेतून समोर येतात. ज्युनियर खेळाडूंसाठी शरीरसौष्ठव जगताची दारे याच स्पर्धेच्या माध्यमातून खुली होत असल्यामुळे मुंबईतील तब्बल दोनशेपेक्षा अधिक ज्युनियर्स गेले तीन महिने व्यायामशाळांमध्ये आपला घाम गाळताहेत. ही स्पर्धा 23 वर्षे वयोगटाखालील खेळाडूंसाठीच आहे. सदर स्पर्धा 55, 60, 65, 70, 75 आणि 75 किलोवरील अशा एकंदर सहा गटांत खेळविण्यात येणार आहे आणि स्पर्धेतील गटविजेत्यांनी अनुक्रमे 5, 4, 3, 2 आणि 1 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येतील. सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक रकमेची बक्षिसे असलेल्या या स्पर्धेत ज्युनियर मुंबई श्री किताब विजेत्याला 15 हजार रुपये तसेच आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येईल.