जॉशच्या संयमी माऱ्यामुळे सामना बंगळुरूच्या बाजूने झुकला, अ‍ॅण्डी फ्लॉवरने हेझलवूडची थोपटली पाठ

अत्यंत चुरशीच्या सामन्यात जॉश हेझलवूडने अखेरच्या षटकात निर्माण झालेली परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली. तसेच, बिकट परिस्थितीमध्ये योग्य चेंडू कसा टाकायचा याची त्याला कल्पना असल्यामुळे त्याने संयमाने गोलंदाजी केल्यामुळेच बंगळुरूला राजस्थानविरुद्ध विजय मिळवता आला, अशा शब्दांत बंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक अ‍ॅण्डी फ्लॉवरनी हेझलवूडची पाठ थोपटत कौतुक केले.

शेवटच्या षटकांमध्ये हेझलवूडच्या शानदार गोलंदाजीमुळे बंगळुरूला घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवता आला. हेझलवूडने त्याच्या शेवटच्या दोन षटकांमध्ये केवळ 7 धावा देत 4 विकेट टिपले. त्याने चार षटकांत 33 धावा देत चार विकेट्स घेतल्यामुळे बंगळुरूला नऊ सामन्यांतील सहावा विजय मिळवता आला.

फ्लॉवर म्हणाले, मी त्याच्या शेवटच्या दोन षटकांबद्दल बोलेन; कारण त्याच्या दोन षटकांमध्ये केवळ सात धावा देत तीन विकेट घेतल्या. या दोन षटकांमध्येच सामना बंगळुरूच्या बाजूने झुकला. तो एक उत्तम जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपात दबाव हाताळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. त्याच्याकडे सर्व प्रकारचे चेंडू टाकण्याची क्षमता आहे. त्याने यॉर्कर, वाइड यॉर्कर आणि स्लो बॉलचे उत्तम मिश्रण टाकले. त्याला माहीत आहे की, कोणत्या प्रकारचा चेंडू कधी टाकायचा. तीन वेगवेगळ्या प्रकारचे वेगवान गोलंदाजी आक्रमण हे बंगळुरूचे सर्वात मोठे बलस्थान आहे.