जोगेश्वरीची पीएमजीपी वसाहत धोकादायक; म्हाडा 942 कुटुंबांना हलवणार

जोगेश्वरी पूर्व पूनम नगर येथील पीएमजीपी वसाहत धोकादायक झाली आहे. पावसाळय़ात इमारतीची पडझड होऊन होणारी जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी ही धोकादायक वसाहत तत्काळ रिक्त करण्याचे आवाहन म्हाडाने रहिवाशांना केले आहे. विशेष बाब म्हणून या धोकादायक इमारतीमधील 942 कुटुंबीयांसाठी म्हाडातर्फे संक्रमण शिबिराची व्यवस्था केली आहे. 1990-92 मध्ये उभारलेल्या या वसाहतीत चार मजली 17 इमारती असून त्यात 942 निवासी तर 42 अनिवासी गाळे आहेत. या वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी संबंधित गृहनिर्माण सोसायटीने श्रीपती रिअल व्हेंचर्स एल. एल. पी. या विकासकाची नेमणूक केली होती. मात्र गेल्या दहा वर्षांत विकासकाने पुनर्विकास केला नाही. त्यामुळे या विकासकाची नेमणूक रद्द करण्यात आली आहे. या वसाहतीच्या पुनर्विकासासाठी म्हाडातर्फे कन्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हलपमेंट पद्धतीने विकासकाची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.