जोगेश्वरीत टोलेजंग इमारतीला भीषण आग; चारजण जखमी

जोगेश्वरी येथे ई टॉवर या 20 मजली इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरुवात केल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र या दुर्घटनेत चार जण जखमी झाले. दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात दलाला यश आले.

जोगेश्वरी पश्चिम, एस. व्ही. रोडवरील दिल्ली दरबार हॉटेल येथील हायराईज ई टॉवर या 20 मजली इमारतीच्या 15 व्या मजल्यावर सकाळी 9 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आग काही क्षणातच इमारतीत पसरत गेली. या घटनेनंतर रहिवाशांमध्ये घबराट पसरली. जीव वाचवण्यासाठी रहिवाशांनी इमारतीबाहेर धाव घेतली. आगीचा धूर पसरल्याने गुदमरल्याने चार जण जखमी झाले. यातील तीन जणांना एसबीएस हॉस्पिटल व एकाला के.जे केअर या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जखमींपैकी एकाला उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला, तर तिघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर अससल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.