मनीषा वायकर यांनी गुन्ह्यांची माहिती लपवली! उमेदवारी अर्ज फेटाळण्याची मागणी

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील मिंधे गटाच्या उमेदवार मनीषा रवींद्र वायकर यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल गुह्यांची माहिती उमेदवारी अर्ज भरताना लपवल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत अपक्ष उमेदवार रोहन सातोने यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवला असून मनीषा वायकर यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याची मागणी केली आहे.

निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्हे तसेच न्यायालयांत प्रलंबित खटल्यांचा संपूर्ण तपशील निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे. देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्देशानुसार हे बंधनकारक आहे. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील मिंधे गटाच्या उमेदवार मनीषा वायकर यांच्याविरुद्ध जोगेश्वरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) आणि ईडीने दाखल केलेले गुन्हे प्रलंबित आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना या गुह्यांची माहिती लपवली, असा आरोप करीत अपक्ष उमेदवार रोहन सातोने यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी याआधारे मनीषा वायकर यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यास नकार दिला. त्यामुळे सातोने यांनी आता राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. आपल्या प्रतिज्ञापत्राची गंभीर दखल घेऊन मनीषा वायकर यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी सातोने यांनी केली आहे.