मुंबई , संदेश सावंत
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच गुरू विरुद्ध शिष्य सामना रंगणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यावरही जोगेश्वरीतल्या जनतेते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मागे खंबीरपणे उभे राहत लोकसभेला भरभरून मतदान केले. यावेळी झालेल्या अटीतटीच्या लढाईत शिंदे गटाला उत्तर-पश्चिम मतदारसंघात निसटता विजय मिळाला असला तरी विधानसभेची लढाई सोपी नाही. शिवसेना उमेदवार अनंत (बाळा) नर यांच्या कडव्या आव्हानामुळे शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांचा विधानसभेचा मार्ग कठीण झाला आहे.
शिवसेनेशी गद्दारी करून ऐन लोकसभा निवडणुकीत जोगेश्वरीचे तीनवेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या रवींद्र वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पण त्यांच्याच मुशीत तयार झालेल्या गटप्रमुख, नगरसेवक ते आता विधानसभेचे उमेदवार बाळा नर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जोगेश्वरी मतदारसंघातून 11 हजारांहून अधिक मतांची आघाडी शिवसेनेचे लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकर यांना मिळवून देत मतदारसंघ अभेद्य ठेवण्याचे काम शिवसैनिकांनी केले.
बाळा नर ‘आपला माणूस’
शिवसेना उमेदवार बाळा नर यांनी नगरसेवक म्हणून केलेले काम सर्वांच्या डोळय़ांसमोर आहे. नगरसेवक असले तरी लोकांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव आणि अडचणीच्या काळात मदतीला धावून जाण्याची वृत्ती म्हणून यामुळे बाळा नर यांची ‘आपला माणूस’ अशी प्रतिमा जनतेच्या मनात तयार झाली आहे.
महायुतीत धुसफुस
रवींद्र वायकर यांच्या पत्नी या एकाच निकषावर शिंदे गटाकडून मनीषा वायकर यांना उमेदवारी देण्यात आली. जोगेश्वरी मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत होती. माजी नगरसेवक उज्ज्वला मोडक त्यासाठी आग्रही होत्या. शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले प्रवीण शिंदेही उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. उमेदवारी न मिळाल्याने या दोघांच्याही समर्थकांत असलेल्या धुसफुसीचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे.