हंटर बायडनची तुरुंगवासाची शिक्षा टळणार? ट्रम्प येण्यापूर्वी जो बायडन यांनी मुलाला माफी दिली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी त्यांचा मुलगा हंटर बायडन याला माफी दिल्याने त्याची संभाव्य शिक्षा टळण्याची चिन्हे आहेत. हंटर बायडन शस्त्रास्त्र कायदा आणि फेडरल करचुकवेगिरी प्रकरणी आरोपी होता. त्याच्यावर खटला सुरू होता. तसेच येत्या काही दिवसात त्याला शिक्षाही सुनावण्यात येणार होती. मात्र, आता बायडन यांनी त्यांच्या कार्यक्ळाचा अखेरचा महिना शिल्लक असताना हंटरला माफी दिल्याने याची चर्चा होत आहे. त्यांनी हंटरला कधीही माफ करणार नाही, असे त्यांनी जाहीर केले होते. आपल्या वक्तव्यापासून त्यांनी फारकत घेत हंटरला माफी दिल्याने याची चर्चा होत आहे.

व्हाईट हाऊसने याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जो बायडन यांनी हंटरला माफी दिली आहे. हंटरला या महिन्याच्या शेवटी दोन वेगवेगळ्या गुन्हेगारी खटल्यांमध्ये शिक्षा सुनावण्यात येणार होती. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प जानेवारीत राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्याआधी बायडन यांनी मुलाला माफी जाहीर केली आहे.

याआधी व्हाईट हाऊसकडून सातत्याने सांगण्यात येत होते की जो बायडन हे त्यांच्या मुलाला हंटर बायडनला कधीही माफ करणार नाहीत. त्याच्यावरील गुन्ह गंभीर स्वरुपाचे असून याबाबत कायद्यानुसार त्याच्यावर जी कारवाई आणि शिक्षा होईल, ती आपल्याला मान्य असेल, असे वक्तव्य जो बायडन यांनी केले होते. मात्र, आता त्यांनी त्यांची भूमिका बदलत हंटरला माफी दिल्याने त्याची शिक्षा टळण्याची शक्यता आहे. अखेर कायद्यासमोर पुत्रप्रेमाचा विजय झाला, अशी चर्चा सोशल मिडीयावर होत आहे.

आपल्या मुलावर राजकीय हेतूने आणि आपली बदनामी करण्याच्या हेतूने खटला चालवण्यात आला. त्यामुळे आपण त्याला माफी देत असल्याचे बायडन यांनी म्हटले आहे. तसेच राष्ट्राध्यक्षांचा मुलगा म्हणून त्याला लक्ष्य करण्यात आले, असेही बायडन म्हणाले. एवढी कारवाई होत असतानाही, खटला सुरू असतानाही हंटर शांत होता. या काळात माझी आणि त्याची बदनामी करण्यात आली. त्यामुळे त्याला माफ करण्याचा निर्णय घेतल्याचे बायडम यांनी म्हटले आहे.

याबाबत हंटर बायडन म्हणाले की, माझ्या व्यसनाच्या काळात केलेल्या चुकांची कबुली दिली आहे आणि त्याची जबाबदारी घेतली आहे. मात्र, राजकीय हेतूसाठी मला आणि माझ्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक करण्यात आल्या. यापुढील काळात आपण आजारी आणि गरजूमना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे हंटर बायडन यांनी सांगितले.