60 हिंदुस्थानींची म्यानमारमधून सुटका,  नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची परदेशात कोंडी

चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवत तरुणांना परदेशात नेऊन त्यांना सायबर फसवणूक करायला लावणाऱ्या टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने धडक कारवाई केली. या टोळ्यांनी म्यानमारमध्ये कोंडी करून ठेवलेल्या 60हून अधिक हिंदुस्थानी नागरिकांची महाराष्ट्र सायबर विभागाने सुखरूप  सुटका केली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून परदेशी नोकरीचे आमिष दाखवून हिंदुस्थानी तरुणांना फसवले जात होते. त्यांना म्यानमार, बँकॉक, थायलंड येथे नेऊन त्यांची कोंडी करण्यात येत होती. त्यांचे पासपोर्ट, व्हिसा काढून घेऊन त्या बेरोजगारांना ऑनलाईन सायबर फसवणुकीच्या कामाला जुंपले जात होते. कोणी फसवणुकीचे काम करण्यास नकार दिल्यास संबंधितांचे अक्षरशः शारीरिक छळ केले जायचे. मानसिक व शारीरिक त्रास देऊन त्यांना सायबर फसवणुकीचे काम जबरदस्ती करायला लावले जात होते. या सायबर गुन्हेगारांच्या टोळीच्या कचाटय़ात 60हून अधिक हिंदुस्थानी नागरिक अडकले होते. अखेर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी त्या टोळ्यांना दणका देत म्यानमारमध्ये अडकून पडलेल्या हिंदुस्थानी नागरिकांची सहीसलामत सुटका केली.

असे फसवून नेले जायचे

फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम यासारख्या समाजमाध्यमांवर एजंट नागरिकांशी संपर्क करत होते. त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले जात होते. मग कोणी तयारी दाखवली की त्यांचे विमानाचे तिकीट, पासपोर्ट, व्हिसा आदी सर्व बाबी एजंट करून देत होते. या नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना पर्यटक व्हिसावर थायलंडला नेत होते. त्यानंतर त्यांना थायलंड-म्यानमार सीमेवर नेले जायचे. मग छोटय़ा बोटीतून नदी ओलांडून म्यानमारमध्ये नेले जात होते.

असा लावला जायचा सापळा 

सुरुवातीला बनावट महिला प्रोफाईल्स तयार करून पीडितांशी संपर्क केला जात होता. मग बनावट पोलीस, कस्टम अधिकारी बनून त्यांना धमकावून पैसे उकळले जात होते. या टोळीचा एक सदस्य म्हणून हिंदुस्थानातील कलाकार मनीष ग्रे ऊर्फ मॅडी, तैसन ऊर्फ आदित्य रवी चंद्रन, रुपनारायण गुप्ता, तालनिती नुलक्सी (चिनी/कझाकस्तानी नागरिक), जेंसी राणी डी यांना अटक केली आहे.