JNU मध्ये आता हिंदू, बौद्ध आणि जैन अभ्यास केंद्रे सुरू होणार; अधिसूचना जारी

एका अधिकृत अधिसूचनेनुसार जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) हिंदू अभ्यास केंद्र सुरू करणार आहे. तसेच यासोबत बौद्ध आणि जैन अभ्यास केंद्रंही उघडण्यात येणार आहेत.

स्कूल ऑफ संस्कृत अँड इंडिक स्टडीज अंतर्गत तीन नवीन केंद्रे स्थापन केली जातील, असं या अधिसूचनेत म्हटलं आहे.

नवीन केंद्रं स्थापन करण्याच्या निर्णयाला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कार्यकारी परिषदेने 29 मे रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (2020) आणि विद्यापीठातील हिंदुस्थानी ज्ञान प्रणालीच्या अंमलबजावणीचा शोध घेण्यासाठी आणि शिफारस करण्यासाठी JNU ने एक समिती स्थापन केली होती.

‘कार्यकारी परिषदेने 29.05.2024 रोजी झालेल्या बैठकीत NEP-2020 आणि हिंदुस्थानी ज्ञान प्रणाली आणि त्याची विद्यापीठात पुढील अंमलबजावणी आणि संस्कृत स्कूलमध्ये खालील केंद्रे स्थापन करण्याबाबत संशोधन आणि शिफारस करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशींना मान्यता दिली आहे’, असं शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे.

दिल्ली विद्यापीठानं (DU) गेल्या वर्षी हिंदू स्टडीजसाठी केंद्र स्थापन केलं जिथे सध्या पदव्युत्तर पदवी दिली जाते. पदवीपूर्व अभ्यासक्रम सुरू करण्याचीही केंद्राची योजना आहे.

दिल्ली विद्यापीठात आधीपासूनच बौद्ध अभ्यासासाठी एक विभाग आहे आणि मार्चमध्ये, 35 कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चात, बौद्ध धर्मातील प्रगत अभ्यास केंद्र स्थापन करण्यास केंद्र सरकारची मान्यता मिळाली.