J&K Terror Attack : चार संशयित दहशतवाद्यांचे स्केच जारी; 20 लाखांचे बक्षीस जाहीर

जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून दहशतवाद्यांचे हल्ले सुरू आहेत. बुधवारी सायंकाळी डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या पथकावर गोळीबार केला. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. तीन दिवसातील हा चौथा हल्ला असून या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या चार संशयित दहशतवाद्यांचे रेखाचित्र जम्मू-कश्मीर पोलिसांनी जारी केल आहे.

जम्म-कश्मीर पोलिसांनी डोडा जिल्ह्यातील दोन हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या चार संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी केली आहेत. त्यांची माहिती देणाऱ्यास 20 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक दहशतवाद्याची माहिती देणाऱ्यास 5 लाख रुपयांचे रोख बक्षीस पोलिसांनी जाहीर केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालेसा गावातील घनदाट जंगलातील कोटा टॉप भागामध्ये बुधवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. ही चकमक अद्यापही सुरुच असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात घेराबंदी करण्यात आली आहे. यादरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेत कॉन्स्टेबल फरीद अहमद हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रियासी येथे भाविकांच्या बसवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचे स्केच जारी; माहिती देणाऱ्यास 20 लाखांचे बक्षीस

कठुआमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-कश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादी हल्ल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. डोडा जिल्ह्यातील हल्ल्याआधी कठुआमध्येही दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक उडाली होती. यात एका दहशतवाद्याला मंगळवारी रात्री, तर दुसऱ्याला बुधवारी सकाळी गोळ्या घालून ठार करण्यात आले. या कारवाईदरम्यान निमलष्करी दलाचा एक जवानही शहीद झाला.