
सर जे.जे. रुग्णालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. रुग्णालयाच्या सर्जरी विभागातील डॉक्टरांनी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेतील आपला हातखंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध केला आहे. त्यांनी केलेल्या शस्त्रक्रियेचे तंत्र वापरून आता जगभरातील डॉक्टर दुर्मिळ शस्त्रक्रिया करू शकणार आहेत. या नव्या तंत्राचा उपयोग केल्याबद्दल जे.जे.च्या डॉक्टरांना अमेरिकेत सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय व्हिडीओ अॅबस्ट्रक्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सेज (सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अँड एंडोस्कोपिक सर्जन्स) ही आघाडीची आंतरराष्ट्रीय शस्त्रक्रिया संस्था आहे. या संस्थेच्या वतीने 12 ते 15 मार्च दरम्यान अमेरिकेच्या लॉस एन्जेलिस येथील लॉन्ग बीच येथे झालेल्या पोडियम प्रेझेंटेशनमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जे. जे. रुग्णालयाच्या सर्जरी विभागाचे प्राध्यापक डॉ. अजय भंडारवार आणि डॉ. गिरीश बक्षी यांच्या नेतृत्वाखालील डॉ. वरुण दत्तानी आणि डॉ. मनीष हांडे यांच्या टीमने यावेळी आपल्या नव्या शस्त्रक्रिया तंत्राच्या व्हिडीओंचे यावेळी सादरीकरण केले. पुरस्कार श्रेणीमध्ये पोडियम प्रेझेंटेशनसाठी निवडलेल्या 7 प्रेझेंटेशनमध्ये ते उजवे ठरले.
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हिंदुस्थान, ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जे. जे. रुग्णालयाचे नाव कोरणे आणि जगासमोर एक उदाहरण स्थापित करणे ही अभिमानाची भावना आहे. वैद्यकक्षेत्राला नवनवीन शस्त्रक्रिया तंत्राची जोड देण्याचा सातत्याने प्रयत्न करू. वैद्यकीय शिक्षण विभागाचेही मोलाचे योगदान आहे. – डॉ. अजय भंडारवार, सर जे. जे. रुग्णालय
या कामगिरीसाठी झाला गौरव
- आतडय़ांमध्ये गाठी निर्माण करणाऱ्या सिंड्रोममुळे रुग्ण हैराण होतो. त्या गाठी पोटाची चिरफाड करूनच काढाव्या लागत होत्या. डॉ. भंडारवार यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या टीमने मिनिमल अॅक्सेस लेप्रोस्कोपिक तंत्राचा वापर करून बिना चिरफाड करता दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केल्या.
- अमली पदार्थ कॅप्सूलमध्ये भरून त्यांची पोटातून तस्करी केली जाते. अशा तस्करांना जुलाबाच्या गोळय़ा देऊन त्या बाहेर काढल्या जातात. अनेकदा कॅप्सूल मोठी असेल तर ती पोटातच अडकून राहते. जे. जे.च्या डॉक्टरांनी विकसित केलेल्या तंत्राचा वापर करून या कॅप्सूल न फुटताच बाहेर काढू शकतो.