लढाऊ तेजसची जबाबदारी मराठी माणसाच्या खांद्यावर, एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीच्या महासंचालकपदी जितेंद्र जाधव

स्वदेशी बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानांच्या निर्मितीची जबाबदारी आता एका मराठी माणसावर सोपवण्यात आली आहे. एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीच्या (एडीए) महासंचालकपदी जितेंद्र जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेजस विमानांच्या निर्मितीमध्ये एडीएची अत्यंत महत्वाची भूमिका राहिलेली आहे.

एडीएच्या महासंचालक पदाबरोबरच लढाऊ विमान विभागाच्या कार्यक्रम संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभारही जितेंद्र जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तेजस एमके-1 या विमानाच्या उत्पादनात जाधव यांनी आजवर महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली असून या प्रकल्पाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

जितेंद्र जाधव यांचा जन्म 19 डिसेंबर 1965 रोजी झाला. पुणे विद्यापीठातून त्यांनी 1987 रोजी इलेक्ट्रॉनिक्सची पदवी मिळविली. एडीएच्या निवेदनानुसार जितेंद्र जाधव यांनी 1999 साली शास्त्रज्ञ अभियंता म्हणून संस्थेत पाऊल ठेवले होते. तेव्हापासून एक उत्तम शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी आपले योगदान दिले आहे.