“हे प्रकरण आता इतकं किचकट आणि किळसवाणं..”, वाल्मीक कराडवरून आव्हाडांच्या मध्यरात्री 2 खळबळजनक पोस्ट

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडाशी संबंधित खंडणीप्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मीक कराड सध्या पोलीस कोठडीत आहे. जवळपास 23 दिवस फरार राहिल्यानंतर मंगळवारी कराड शरण आला होता. तो ज्या गाडीतून आला ती गाडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला होता. आता याच संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री दोन खळबळजनक पोस्ट केल्या आहेत.

हे वाचा – संतोष देशमुख हत्येप्रकरणी SIT चौकशी अहवालानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय, भाजपच्या मंत्र्याचं मोठं विधान

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी वाल्मीक कराडच्या गाडीचे गुपित उघड केले. अजित पवार संतोष देशमुखच्या गावी गेले तेव्हा हीच गाडी त्यांच्या ताफ्यात होती. हे प्रकरण आता इतके किचकट आणि किळसवाणे व्हायला लागले आहे की सामान्य माणसांना राजकीय माणसांबद्दल शिसारी निर्माण होईल, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. तसेच अजित पवार हे काहीच खपवून घेत नाहीत, अशी त्यांची प्रतिमा आहे. मग, त्यांना या गोष्टी कशा काय खपतात? असा सवालही त्यांनी केला.


दुसऱ्या एका पोस्टमध्ये आव्हाड म्हणतात की, महाराष्ट्र हे बिहार नाही तर महाराष्ट्र आता आफ्रिकेतील सर्वाधिक क्राईम रेट असलेल्या पीटरमारित्झबर्ग शहराप्रमाणे झाले आहे. एखाद्या माणसाला उचलून न्यायचे आणि थेट गायबच करून टाकायचे, असे प्रकार फक्त आफ्रिकेत व्हायचे; तेच आता बीडमध्येही घडते, हे आता उघड होऊ लागले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पोलिसांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.