वाल्मीक खडा तो वो सरकारसे बडा!! थोडी तरी लाज बाळगा!!! जितेंद्र आव्हाड यांचा महायुती सरकारवर निशाणा

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी प्रमुख आरोपी वाल्मीक कराडला मकोकाअंतर्गत अटक झाली आहे. तो सध्या तुरुंगात आहे. तिथे त्याला मिळणाऱ्या सोयी-सुविधा आणि त्याला देण्यात येणाऱ्या वागणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. वाल्मिक खडा तो वो सरकारसे बडा, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

याबाबत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये आव्हाड यांनी म्हटले आहे की, हॉस्पीटलमधून बाहेर काढलेल्या वाल्मीक कराडला आता बीडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. बंदीवासात त्याच्या दिमतीला सात हवालदार तैनात ठेवलेले आहेत. बीडमधील त्याच्या गँगमधील छोटे – मोठे गुन्हेगार मुद्दामहून स्वतःवर एखादा गुन्हा ओढावून घेतात अन् या गुन्हेगारांची रवानगी बीड मध्यवर्ती कारागृहात होते. बीड कारागृहात ते ‘आपोआप’ वाल्मीक कराडच्या जवळ पोहचतात आणि मग, रात्री मस्त मैफिल रंगत असते. एकंदरीत तो कारागृहात आहे, अशी भावनाच त्याच्या मनात निर्माण होऊ द्यायची नाही, असा निर्णय शासन दरबारी झालेला दिसतो. बाकी महाराष्ट्रात आजपर्यंत असे कधी बघितलेले नाही की, कायद्याने जामीन नाकारलेल्या इसमाला एवढे हवालदार दिमतीला तैनात केले आहेत ! अर्थात, तो वाल्मिक कराड आहे… वाल्मिक खडा तो वो सरकारसे बडा !! थोडी तरी लाज बाळगा !!!, असे आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.