आमचा पक्ष चोरला, चिन्ह चोरले आता आमचे खासदारही पळवून नेणार का? जितेंद्र आव्हाड यांचा संतप्त सवाल

आगामी मुंबईसह इतर महापालिका आणि स्थआनिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी शरद पवार यांच्या पक्षाची बैठक 8 आणि 9 जानेवारीला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार आहे. त्यात आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या पक्षातील खासदारांशी संपर्क साधल्याची चर्चा आहे. याबाबत शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही शरद पवार यांचे कट्टर कार्यकर्ते आहोत, आम्ही एकवेळ मृत्यूला कवटाळू मात्र, गद्दारी कधीही करणार नाही, अशा शब्दांत त्यांनी अजित पवार गटाला ठणकावले आहे.

शरद पवार यांचे आमच्यासारखे कार्यकर्ते मृत्यूला कवटाळतील, पण कधीही गद्दारी करणार नाही. आमचा पक्ष चोरला, चिन्हही चोरले, आता आमच्या खासदारांनाही खांद्यावर उचलून नेणार आहात का, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे की, आम्ही कुठेही जाणार नाही.आम्ही विरोधात राहणार असून लढणार आहोत. आमच्या साहेबांनी आम्हांला दिलेली दिशा महत्त्वाची आहे. त्यामुळे आमचे आमदार, खासदार कुठेही जाण्याचा प्रश्नच नाही, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले. आता आपल्या खासदारांना घेऊन जाण्याची तयारी सुरू आहे, पण कोणीही जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बाप लेकीला बाजूला ठेवा आणि तुम्ही इकडे या असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र, ही आमची संस्कृती नाही. आम्ही कधीही गद्दारी करणार नाही, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, अजितदादा आणि शरद साहेबांची इच्छा असेल तर ते एकत्र येऊ शकतात, पण त्यांना यायचे आहे की नाही हे मला माहीत नाही. त्याचवेळी सत्ताधारी पक्षांनी शरद पवार यांच्या पक्षातील अनेक खासदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र एकाही खासदाराने त्यांना प्रतिसाद दिला नाही. आमचे आमदार, खासदार कोणीही आम्हाला सोडून जाणार नाहीत, असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला.