Jitendra Awhad अन् अखेरीस एक दिवस आपल्या देशाचा “श्रीलंका” होईल, जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली भीती

डॉलरच्या तुलनेत रुपया 87 रुपयाची किंमत 87 रुपये 30 पैशांपर्यंत पोहोचली आहे. रुपयाच्या या घसरणीवरून सध्या मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावरून केंद्रातील मोदी सरकारला फटकारले आहे. आव्हाड यांनी ट्विटरवर एक सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमधून त्यांनी जर असाच रूपया पडायला लागला तर देश कर्जबाजारी होईल व एक दिवस आपल्या देशाचा “श्रीलंका” होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.

”8 जानेवारीला एका डॉलरची किमंत 85 रूपये 87 पैसे होती. तीच 14 जानेवारीला 86 रूपये 88 पैसे झाली आणि आज 5 फेब्रुवारीला तीच किंमत 87 रूपये 30 पैसे आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर रूपया कधीच एवढा पडला नव्हता. एकीकडे 5 ट्रिलियनची इकॉनॉमी आम्ही करू, असे म्हणत लोकांना वेड्यात मोजणाऱ्यांना पडणाऱ्या रूपयाची चिंताच दिसत नाही. पडणाऱ्या रूपयाचा जागतिक अर्थव्यवस्थेत देशाच्या प्रतिमेवर काय परिणाम होतो, हे कसे कळत नाही. नरेंद्र मोदी असो अगर सुषमा स्वराज असो; त्यांचे वाक्य मला आजही आठवते, “जब डॉलर की तुलना मे रूपया गिरता है, तब वो रूपया नही, देश की इज्जत गिर जाती है. देश की प्रतिष्ठा मिट्टी में मिल जाती है.” त्यांच्याच भाषणातील ही वाक्ये आज त्यांच्यासमोर प्रश्न म्हणून उभी करायला हवीत. जर असाच रूपया पडायला लागला तर देश कर्जबाजारी होईल. वरून दिसायला कितीही सुंदर असले तरी अर्थव्यवस्था आतून पोखरली जाईल अन् अखेरीस एक दिवस भारताचा “श्रीलंका” होईल”, अशी भीती त्यांनी व्याक्त केली आहे.

”ज्या पद्धतीने ट्रम्प आपले पत्ते फेकत आहेत. त्यामुळे उत्पादनाच्या बाबतीत आपण आधीच मागे पडलो आहोत. आपली उत्पादन साखळी (प्रोडक्शन चैन) जवळपास संपुष्टात आली आहे. मी ठाण्यात राहतो, लहानपणापासून पाहतोय की, जगातील सर्वात मोठा इंडस्ट्रीयल बेल्ट कोणता, असा प्रश्न विचारल्यावर साहजिकच उत्तर यायचे ते म्हणजे बेलापूर पट्टा ! आज त्या बेलापूर पट्ट्यात पाच टक्केही उद्योग जिवंत नाहीत. इथे सगळेच प्रोडक्शन युनिट्स होते. प्रोडक्शन युनिट्स गेल्याने रोजगार बंद झाले. रोजगार बंद झाल्याने त्याचे एकंदरीतच अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाले. आता आपण जिवंत आहोत, ते सर्व्हीस इंडस्ट्रीवर आणि सर्व्हीस इंडस्ट्री जिवंत आहे ती आयातीवर! जर देश आयातीवर जिवंत राहिला तर प्रोडक्शन होणारच नाही आणि आयातीवर जिवंत असलेला कुठलाही देश प्रगती करू शकत नाही, हे सत्य आहे”, असेही त्यांनी ट्विट केले.