लडाखमध्ये मेंढपाळांच्या एका गटानं अत्यंत धैर्यानं चिनी सैनिकांचा सामना केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) मेंढ्या चरण्यापासून रोखण्याचा प्रयत्न चिनी सैनिकांकडून करण्यात आला. त्यावेळी मेंढपाळांनी धैर्य दाखवत हिंदुस्थानचा भूभाग असून या भागात मेंढ्यांना चरण्यासाठीचं कुरण असल्याचं सांगत ठामपणे जागा सोडणार नाही असं सांगितलं. या घटनेनंतर हिंदुस्थानी या मेंढपाळांचं कौतुक होत असून केंद्र सरकारवर टीका होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील केंद्र सरकारवर टीका केली आहे. आव्हाड यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड करत एक पोस्ट शेअर केली आहे. ”संपूर्ण देशाला देशप्रमाचे धडे देणारं आणि देशभक्तीचा मक्ता मिरवणाऱ्या केंद्र सरकारची चीनचा मुद्दा आला की दातखिळी बसते. 2 जानेवारी रोजी एलओसी नजिकच्या पेट्रोलिंग पॉईंट (PP) 35 आणि 36 जवळ शूट केलेल्या व्हिडिओमध्ये चीनी सैनिक आणि स्थानिक भारतीय मेंढपाळांमधील हाणामारी स्पष्टपणे दिसून येत आहे. एप्रिल-मे 2020 पासून या प्रदेशात भारतीय सैनिकांनी पेट्रोलिंग बंद केलंय.इथल्या अनेक ठिकाणी यापूर्वी पेट्रोलिंग केली जात असे,त्या प्रदेशाला ‘बफर झोन’ म्हणून घोषित करण्यात आलंय.एवढंच नव्हे तर परमवीर चक्राने सन्मानित मेजर शैतान सिंह यांची समाधीदेखील तोडण्यात आली आहे. एरव्ही समाजमाध्यमांवरील धार्मिक मुद्यांशी निगडीत ‘फेक’ व्हिडिओंवरून ‘प्राईम टाईम’ चर्चा घेणारं ‘गोदी मीडिया’ आता मात्र मूग गिळून बसले आहे. केवळ चीनी ॲपवर बंदी घालून सामान्यांच्या डोळ्यांत धूळफेक करणा-या सरकारच्या हातात भारताच्या सीमा सुरक्षित नाहीत,हे ढळढळीत सत्य पुन्हा एकदा समोर आले आहे”, अशी टीका आव्हाड यांनी या पोस्टमधून केली आहे.