संतोष देशमुख प्रकरणात नेमलेल्या SIT मध्ये वाल्मीकशी संबंधित पोलीस अधिकारी, जितेंद्र आव्हाड यांनी थेट फोटोच केले शेअर

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटी कमिटीमध्ये वाल्मीकी कराड याशी संबंधित पोलीस असल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांनी X वर एक पोस्ट करत थेट या पोलीस अधिकाऱ्याचे वाल्मीकी कराड याच्या सोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये एसआयटी कमिटीमधील पीएसआय महेश विघ्ने वाल्मीकी कराडसोबत दिसत आहे.

आपल्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ”संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या एसआयटीमध्ये एक प्रमुख आयपीएस बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मीकीचे पोलीस आहेत. यातील एक पीएसआय महेश विघ्ने पाहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा हा फोटो आहे. किती जवळचे अन् प्रेमाचे संबध आहेत. हे असले अधिकारी वाल्मीकला शिक्षा देतील की मदत करतील?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले आहेत की, याच विघ्ने यांनी निवडणूक काळात धंनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे काम केलं आहे.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, ”यातच मनोजकुमार वाघ हा वाल्मीक कराडचा अत्यंत खास माणूस असून गेले 10 वर्षे तो बीड एलसीबी मध्येच आहे आणि वाल्मीकसाठी काम करतोय.”

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीमध्ये कोणत्या अधिकाऱ्यांचा आहे समावेश?

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक नेमण्यात आलं आहे. यात पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, सपोनि विजयसिंग जोनवाल, पीएसआय महेश विघ्ने, पीएसआय आनंद शंकर शिंदे आणि सहाय्यक पीएसआय तुळशीराम जगताप यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे.