अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादीच्या सात खासदारांना सत्तेत येण्याची ऑफर देण्यात आली आहे. यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. तुम्ही बापाला आणि लेकीला बाजूला ठेवा, या आमच्याकडे, अशी ऑफर देण्यात आल्याचे आव्हाड म्हणाले.
बुधवारी माध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले की, एकीकडे दैवत म्हणायचे आणि दुसरीकडे खासदार फोडायचे. लोकांच्या मनात काय उलटे सुटले सुरू असते हे कळत नाही. पक्ष घेतला, चिन्ह घेतले, आता खासदारही पळवणार आणि दुसरीकडे एकत्र येताहेत अशी बोंबाबोंब करायची. एकत्र येत असतील तर खासदार का फोडता?
शरद पवार देव, दैवत आहेत. त्यांच्याकडूनच आम्ही सगळे शिकलो असे म्हणतात. काय शिकलात तुम्ही? असा सवाल आव्हाड यांनी केला. यावेळी आव्हाड यांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या प्रश्नालाही उत्तर दिले. शरद पवार यांनीही यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे, असा उल्लेख आव्हाड यांनी केला.