मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर शंका व्यक्त करत बॅलेट पेपरने मतदान घेण्याचे ठरवले होते. यासाठी ‘मॉक पोल’चे आयोजन करण्यात आले होते. मात्र घाबरलेल्या सरकारने हा ‘मॉक पोल’ थांबवले आणि ग्रामस्थांविरुद्ध गुन्हे दाखल केले. काही जणांना अटकही केली. यामुळे महाविकास आघाडीने आक्रमक होत शनिवारी निषेध म्हणून शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वातंत्र्यांचा दुसरा अध्याय सुरू झाला असून मारकडवाडीचा प्रयोग आधुनिक भारताचा ‘दांडी मार्च’ असेल असे विधान यावेळी केले.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मारकडवाडी येथे जो प्रयोग होणार होता तो सरकारने जबरदस्तीने थांबवला. लोकांना आंदोलनाचा अधिकार आहे. तो अधिकार सरकारने हिरावून घेतला आणि अटकसत्र सुरू केले. महात्मा गांधी यांच्या विचारांना पुढे घेऊन मारकडवाडीतील ग्रामस्थांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचे ठरवले. त्यांना नक्की गुन्हा काय? त्यांना अटक का केली? मारकडवाडीचे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल म्हणून सरकार घाबरले आणि अटक करून फुंकर मारली.
हे वाचा – मतदान चोर सरकारचा निषेध म्हणून आज विधानसभा सदस्यपदाची शपथ न घेण्याचा मविआचा निर्णय: नाना पटोले
सामान्य माणसाला घाबरवून, दरडावून राज्य करता येते असा समज असेल तर सामान्य माणूस राज्य पलटवू शकतो हे दांडी मार्चने दाखवून दिले होते. स्वातंत्र्य लढ्यात दांडी मार्चची यात्रा नवीन चालना देणारी ठरली, तसेच एकाधिकारशाहीला रोखण्यासाठी मारकडवाडीचा प्रयोग आधुनिक भारताचा दांडीमार्च असेल. नवीन दांडी मार्च मारकडवाडीच्या नावाने ओळखला जाईल, असे आव्हाड म्हणाले.
मारकडवाडीत पडलेली ठिणगी देशभरात पोहचवण्याचा संकल्प
लोकशाही व मताचा अधिकार वाचवण्याची जबाबदारी आमची आहे. मारकडवाडीतून जी ठिणगी पेटलेली आहे ती देशात पोहचवण्याचा संकल्प आहे. यासंदर्भात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली असून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या आंदोलनावर दिल्लीत तयारी सुरु आहे. सर्व तयारी झाल्यानंतर मारकडवाडीचे आंदोलन देशव्यापी करण्यासंदर्भात निर्णय होईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.