तुझ्यामागे ईडी लावू तुला तुरुंगात डांबू, अशा धमक्या दिल्याने मी अजित पवार गटात गेलो! अभिजित पवारांनी केला पक्षप्रवेशाचा पर्दाफाश

माझ्यावर गुन्हा दाखल करून मला पुन्हा दोन वर्षे जेलमध्ये पाठविण्याचे प्लॅनिंग होते, माझ्या मित्रांनादेखील पोलिसांकरवी धमक्या दिल्या जात होत्या. ईडीची चौकशी मागे लावण्याचा दम दिला जात होता. या दबावामुळे मी अवस्थ झालो आणि मी अजित पवार गटात प्रवेश केला, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजित पवार यांनी करून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. अवघ्या 24 तासात पवार यांनी अजित पवार गटातील प्रवेशाचा पर्दाफाश केल्याने ठाणे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ठाणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात अभिजित पवार यांनी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत आज पुन्हा तुतारी हाती घेतली. त्यानंतर झालेल्या एका पत्रकार परिषदेत पवार यांनी खळबळजनक आरोप केले. नजीब मुल्ला मला फोन लावून देऊन इतरांकरवी धमक्या देण्याचे काम करीत करीत होते. त्यामुळेच मी आव्हाड यांना न सांगता केवळ दबावापोटी अजित पवार गटात सामील झालो होतो, परंतु माझा वापर केवळ आव्हाड यांना अडकविण्यासाठी केला जाणार होता, हे लक्षात येताच मी पुन्हा आव्हाडांकडे आलो असल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

माझ्या कुटुंबाला घाबरविण्याचा प्रयत्न

केवळ ब्लॅकमेलिंग करून माझ्यासह मित्रांना अडकविण्याचा प्रयत्न झाला. तसेच इतरांच्या बाबतीतही तसाच प्रकार सुरू असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला, परंतु आव्हाड यांचा फोन आला नसता तर मीसुद्धा आत्महत्या केली असती, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. माझ्या आईला आणि पत्नीलादेखील घाबरविण्याचा प्रयत्न केला जात होता. या सर्व छळवणुकीमुळे मी प्रचंड घाबरलो होतो, असेही अभिजित पवार यावेळी म्हणाले.