वाल्मीक कराडच्या आधीच्या गुन्ह्यांचा तपास व्हावा म्हणून न्यायिक चौकशीची मागणी, आव्हाडांचे विधान

संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाजन नावाच्या अधिकाऱ्याने चूक केली असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तसेच वाल्मीक कराडच्या आधीच्या गुन्ह्यांचा तपास व्हावा म्हणून न्यायिक चौकशीची मागणी केली असेही आव्हाड म्हणाले.

आज राज्यपालांना सर्वपक्षीय नेत्याच्या शिष्टमंडळाने भेट दिली. त्यानंतर आव्हाडांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा आव्हाड म्हणाले की, जातीपातीचं राजकारण बंद करा. संतोष देशमुख हे कुठल्या जातीचे आहेत हे आम्ही पाहिले नाही. आम्ही सर्वपक्षीय नेते, एकत्र आलो. विधानसभ अधिवेशनापूर्वीच आम्ही म्हणालो होतो, की मरणारा गेला पण त्याला मारण्याऱ्याचे उदात्तीकरण झालं तर महाराष्ट्राचं वाटोळं होईल. माणुसकीची हत्या झाली, तुकडे केले. या प्रकरणाची घृणा संपूर्ण महाराष्ट्रात आहे. मी दुसऱ्याही जातीच्या माणसांना सांगतोय की ज्याने खून केला त्याचे उदात्तीकरण का करत आहात? संतोष देशमुख यांच्या हत्येची न्यायिक चौकशीची मागणी आम्ही यासाठी केली की यामागे जे काही गुन्हे झाले ते उघडकीस आले पाहिजे असे आव्हाड म्हणाले.

तसेच आपण जातीपातीत एवढे अडकून घेतो स्वतःला की या चौकशीची वाट लागेल. एकीकडे कायदा हातात घेण्याची भाषा होत असेल तर संविधानावर आपलाच विश्वास नाही असे आपल्याला म्हणावं लागेल. कायदा हातात घेण्याची कुठलीही भाषा योग्य नाही. आम्ही संविधानिक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय. आणि कलम 302 मध्ये वाल्मीक कराडचा आरोपी झाला पाहिजे ही आमची पहिल्या दिवसापासून मागणी आहे. सोमनाथ सुर्यवंशीची झालेली हत्या ही तितकीच गंभीर आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वात जास्त चूक कुणाची असेल तर महाजन नावाच्या अधिकाऱ्याची आहे. त्याच महाजनची सरकारने बाजू घेतली आणि त्याच महाजनची सरकारला बदली करावी लागली. महाजनने अशोक सोनावणची अॅट्रॉसिटीची तक्रार घेतली असती तर हे प्रकार झालेच नसते. हाच महाजन बापू आंधळे प्रकरणाच चौकशी अधिकारी होता, त्याने वाल्मीक कराडचे नाव न घेता वाल्मीक अण्णा लिहिले आहे. तोच महाजन केजला अधिकारी म्हणून गेला. तिथे अशोक सोनावणेने तक्रार दिली पण त्यांची तक्रार घेतलीच नाही. अशा महाजनची बदली केली, पण उशिर केला. आजकाल सरकारला उशिरा शहाणपण सूचतं अशी टीकाही आव्हाड यांनी केली.