मी राजीनामा दिला होता, याचा अर्थ तू पण दे! अजितदादांच्या विधानावर आव्हाडांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

सिंचन घोटाळ्याप्रकरणी आपल्यावर आरोप झाले तेव्हा आपण मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडप्रकरणी राजीनामा दिला पाहिजे असे संकेत दिले होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज मुंडे यांच्यावर निशाणा साधला. मी राजीनामा दिला होता, या अजितदादांच्या विधानाचा अर्थ, तू पण राजीनामा दे असाच आहे. नैतिकता कुणालाही शिकवावी लागत नाही, असे आव्हाड मुंडेंना उद्देशून म्हणाले.

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होत आहे. भाजप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडे यांच्याविरोधातील पुरावेही अजित पवार यांच्याकडे दिले. त्यानंतरही मुंडे यांनी राजीनामा दिलेला नाही.

अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळयाप्रकरणी आरोप झाले तेव्हा त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मोठे आरोप होतात, चौकशी लागते तेव्हा सत्तेच्या वर्तुळातून बाहेर पडणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ती नैतिकता कुणालाही शिकवावी लागत नाही, असे जितेंद्र आव्हाड प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अजितदादांची घुसमट झाली आहे असेही ते म्हणाले. अजितदादा कधीही इतके असहाय्य दिसले नव्हते. धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्याची ते हिंमत का दाखवत नाहीत हेच कळत नाही, असेही ते पुढे म्हणाले.

बावनकुळेसाहेब, तुमच्या गटप्रमुखाची हत्या झाली

संतोष देशमुख  हत्या प्रकरणात आवाज उठवणारे भाजपचे आमदार सुरेश धस आणि ज्यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत ते मंत्री धनंजय मुंडे यांच्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडवली घडवून आणली. त्यावर आज धनंजय देशमुख यांनी जोरदार पलटवार केला. हत्या झाल्यानंतर शरद पवार हे भेटण्यासाठी आले होते पण बावनकुळे मात्र आले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. संतोष देशमुख हा भाजपचा सच्चा कार्यकर्ता होता. पंकजा मुंडे, नमिता मुंदडा यांच्या निवडणुकांमध्ये त्याने बूथप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती. निवडणूक प्रक्रियेत बूथप्रमुख हे अत्यंत महत्त्वाचे पद समजले जाते, असेही देशमुख म्हणाले.