राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत निवडणुकीचे पुरावे बंद कपाटातून गायब, आमदार अपात्रता सुनावणीवेळी जितेंद्र आव्हाड यांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता सुनावणीवेळी आज पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी धक्कादायक माहिती दिली. राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत निवडणुकीचे गोपनीय पुरावे बंद कपाटातून गायब झाले असून पक्ष सोडून गेलेल्या दोन पदाधिकाऱयांकडे ते पुरावे होते, अशी माहिती आव्हाड यांनी दिली.

विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्यासमोर आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसची आमदार अपात्रता सुनावणी सुरू झाली. आज पहिल्याच दिवशी जितेंद्र आव्हाड यांची फेरसाक्ष नोंदवण्यास सुरुवात झाली. त्यावेळी अजित पवार गटाच्या वकिलांनी पक्षाची रचना व अन्य मुद्दय़ांबाबत आव्हाड यांना प्रश्न विचारले. पक्षांतर्गत निवडणुका झाल्या होत्या का, असा प्रश्न वकिलांनी आव्हाड यांना केला. त्याला उत्तर देताना आव्हाड म्हणाले की, ‘माझ्या माहितीनुसार निवडणुका झाल्या होत्या आणि त्यासंदर्भातील कागदपत्रे पक्ष कार्यालयातील एका कपाटात ठेवण्यात आली होती. निवडणुकीची जबाबदारी दिलेल्या दोन पदाधिकाऱयांनी पक्ष सोडून जाताना ते कपाट रिकामी केले. त्यावेळी कागदपत्रांमध्ये ते काय घेऊन गेले हे आम्हाला माहीत नाही. त्यांनी या पुराव्यांचे नेमके काय केले हेदेखील माहीत नाही.’

शरद पवार यांची अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा मी उपस्थित होतो. शरद पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडून आले होते का? त्यावेळी तुम्ही उपस्थित होतात का? असे शरद पवार गटाच्या वकिलांनी आव्हाड यांना विचारले. त्याला आव्हाड यांनी होकारार्थी उत्तर दिले. शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली त्यावेळी मी स्वतः तसेच सगळे वरिष्ठ नेते उपस्थित होते, असे आव्हाड यांनी सांगितले.