वेस्ट इंडिजमध्येही महिला टी20 क्रिकेट लीगची धूम, भारतीय महिला बनणार मेंटॉर

भारतानंतर आता वेस्ट इंडिजमध्येही महिला टी20 क्रिकेट लीग सुरू झाली आहे. पुढच्या महिन्यात 21 ऑगस्टपासून वुमन्स कॅरिबियन प्रीमियर लीगच्या पुढच्या सीझनला सुरुवात होणार आहे. ही लीग 29 ऑगस्ट रोजी संपले. विशेष म्हणजे भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वामी एका संघाचे मेंटॉर म्हणून काम पाहणार आहे. भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावणारी झुलन आता परदेशी संघाला मार्गदर्शन करणार आहे.

अनेक भारतीय महिला खेळाडूही या लीगमध्ये खेळणार आहेत. या लीगमध्ये सध्या फक्त तीन संघ आहेत, त्यापैकी दोन संघ आयपीएल फ्रँचायझी आहेत. यामध्ये बार्बाडोस रॉयल्स महिला, गयाना ॲमेझॉन वॉरियर्स महिला आणि त्रिनबागो नाइट रायडर्स महिला असे तीन संघ सहभागी होत आहेत. यापैकी त्रिनबागो नाईट रायडर्स संघाला झुलन मार्गदर्शक करणार आहे.

झुलन भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालच्या महिला संघाची मार्गदर्शक होती. तसेच ती महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सची मार्गदर्शक आणि गोलंदाजीची प्रशिक्षकही आहे. झुलनसोबत जेमिमाह रॉड्रिग्स आणि शिखा पांडेही या संघात आहेत.

“एवढ्या मोठ्या फ्रँचायझीचा भाग बनणे ही सन्मानाची गोष्ट आहे. नाइट रायडर्सने भारतात चांगली कामगिरी केली आहे आणि महिला कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये या संघाशी जोडले जाणे हा सन्मान आहे.” अशा शब्दात झुलनने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

झुलनने 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे. यानंतर ती कोचिंगमध्ये गेली. आता नाईट रायडर्ससाठी ती महत्वपूर्ण जबाबदारी निभावणार आहे.