>> मेघना साने
देशात कुटुंबासह भटके जीवन जगण्याची परंपरा असलेल्या काही भिक्षेकरी व भटक्या जमाती आहेत. यातलीच एक नाथपंथी डवरी गोसावी ही जमात. हे लोक अंगात भगवे कपडे, हातात त्रिशूल व डवर म्हणजे डमरू घेऊन शंकर महादेवाचे भक्त; नाथांचे, काळभैरवांचे अनुयायी या नात्याने गोसाव्याच्या रूपात घरोघर, गावोगाव जाऊन भिक्षा मागतात. दैनंदिन गरजेपुरती भिक्षा मागणे ही त्यांची परंपरा. त्यातील काही जण छोटे छोटे व्यवसाय करीत जगतात. जसे भंगार, रद्दी कागद, टाकाऊ रबर, प्लास्टिक, काचा वेचणे इत्यादी. मात्र भटकंती आणि भिक्षावृत्ती कायम राहते.
हा नाथपंथी डवरी समाज पिढ्यान्पिढ्या नाथांची गाणी, कथा गाऊन, कधी बहुरूपी होऊन विविध रूपे धारण करत समाज प्रबोधनाचे काम करून आपले योगदान देतच आला आहे. या प्रबोधनाच्या बदल्यात त्याला काय मिळाले, तर झोळी! या डवरी समाजातील एक मुलगा कालिदास अंकुश शिंदे. शिक्षणाची आस धरून अनेक हालअपेष्टा सहन करीत शिकला. आईवडील पालावर राहत होते. भिक्षेकरी होते. कधी पालावर राहावे लागले तेव्हा त्याने रस्त्यावरच्या म्युनिसिपालटीच्या दिव्याखाली अभ्यास केला. नाल्याजवळ असलेल्या निवाऱयात डास आणि मुंगळे यांच्याशी सामना करत जीवन पुढे नेत होता. आई-दादा भिक्षा मागून शिक्षणासाठी पैसा जमवत होते. उच्च शिक्षणासाठी कधी नातलग व शिक्षक यांनी मदत केली आणि कालिदासने पुढे एम.ए. केले. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत प्रवेश घेऊन, फिल्डवर्क करून एमएसडब्ल्यू केले, एम.फिल. केले. नाथपंथी डवरी समाजातील माणसांच्या जगण्यावर संशोधन करून आयसीएसएसआर, नवी दिल्लीतर्फे अस्पिरांट प्रोजेक्टसाठी फेलोशिप मिळवली. कालिदास यांना आता डॉक्टरेट मिळालेली आहे.
डॉ. कालिदास शिंदे यांच्या आत्मकथनातून नाथपंथी डवरी समाजाची आणि तत्सम अनेक भटक्या जमातींची इत्यंभूत माहिती मिळते. हे लोक पालावर राहतात. वीज कनेक्शन, पाण्याची सोयही नसते. पाले कधीही उठवली जातात. जीवन अनिश्चित असते. गावात जत्रा किंवा दिंडी असेल तर तेथे जाऊन हे लोक लोककला, गोंधळ, नाथांची गाणी, भजन, कीर्तन करून, स्टोव्ह दुरुस्तीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. भिक्षा मागतात. काही लोक उत्तम गायक, पेटीवादकही असतात. आपली कला आपण देवासाठी सादर करतो अशी त्यांची श्रद्धा असते. भिक्षा मागणे हीदेखील त्यांची संस्कृतीच आहे. बाहेरून मागून आणलेले जेमतेम एक दिवस पुरते. त्यामुळे कुटुंबासाठी त्यांना रोजच दाही दिशा फिरावे लागते.
कालिदासने हट्ट करून आश्रमशाळेत प्रवेश घेतला. त्यासाठी लागणारे पैसे त्याने भंगारातून वेचलेल्या तारा विकून उभे केले. आश्रमशाळेत त्याचे व्यक्तिमत्त्व उत्तम घडले. सुट्टी लागल्यावर आपले आईदादा कोणत्या गावाला असतील हे माहीत करून घ्यावे लागायचे. डॉ. कालिदास शिंदे यांनी हे आत्मकथन त्यांच्या बोलीभाषेत लिहिल्यामुळे प्रत्येक प्रसंग जिवंत झाला आहे. पालावर राहणाऱया लोकांना कोणालाही शिक्षणाचे कौतुक नसायचेच, पण कालिदास यांनी शिक्षण सोडले नाही.
शिक्षणापासून वंचित असलेला आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत मागे असलेला असा हा समाजांतर्गत पाहिला तर वेगवेगळ्या गटांमध्ये विखुरलेला दिसतो. याच्या अनेक पोटजाती, उपजाती आहेत. प्रत्येक जातीने आपले स्वतंत्र नियम केले आहेत. प्रमुख नेत्यांचा नेतृत्वाकरिता संघर्ष चाललेला दिसतो. येव्हार म्हणजे जमातीच्या माणसांमध्ये तंटाबखेडा, मुलीला नांदवण्यावरून वाद, गुन्हेगार वृत्तीची पार अशा कारणांसाठी जात पंचायत असते, कायदे असतात. जात पंचायत 800 वर्षांपूर्वीचा ‘बा’चा कायदा मानते. कोणी पोलीस स्टेशनात पार वगैरे करून आले तरी जमातीतला येव्हार पाळावा लागतो. मग कोणाला शिक्षा म्हणून वाळीत टाकणे म्हणजे जमातीतील सर्वांनी संबंध तोडणे वगैरेसारख्या शिक्षा असतात किंवा दंड आकारला जातो. डॉ. कालिदास शिंदे आत्मकथनात म्हणतात, “आम्ही लाचारीने जगत आलो. आमच्या अशा प्रकारच्या जगण्याला व्यवस्था कारणीभूत आहे. खरे तर आमचा समाज आपली धार्मिक परंपरा, आचरण यांपासून तसूभर दूर राहिला नाही. आपले आचरण शुद्ध ठेवले तरीही समाजावरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. समाजाने आता तरी शहाणे व्हावे. नाहीतर इथल्या सांस्कृतिक राजकारणाचे बळी तुम्हीच असाल.”
कालिदास यांनी पीएच.डी. मिळवली खरी, पण त्यांना आईदादांची झोळी थांबवता आली नाही. भटक्या जमातीतील कुटुंब जीवन, गरिबी आणि समाजातील मागासलेपणा यामुळे उच्च शिक्षण घेताना कालिदास यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. उपजिविकेसाठी शासन काही पर्याय देईल का? सन्मानाचे जीवन मिळेल का? इतके मोठे उच्च शिक्षण घेऊनही पूर्णवेळ नोकरी नसल्याने त्यांनाही काखेला झोळी लावून भिक्षा मागून जगावे लागेल की काय? या विचाराशी येऊन ते खिन्न होतात. ही नाथपंथी डवरी समाजाची व्यथा मांडणाऱया या पुस्तकास अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा 2023चा साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. लक्ष्मीकांत देशमुख यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे, “डॉ. कालिदास शिंदे हे संशोधक वृत्तीचे पीएच.डी धारक आहेत. खऱया अर्थाने जगणे आणि शिक्षणातून डोळस भान असणारे ते समाजशास्त्रज्ञ व मानववंशशास्त्रज्ञ आहेत.” त्याचप्रमाणे ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड, बाळकृष्ण रेणके यांचेही चार शब्द या पुस्तकाला लाभले आहेत.