झारखंडमध्ये गुटखा आणि पान मसाल्यावर बंदी; कठोर कारवाई करण्याचे आदेश

झारखंडमध्ये गुटखा आणि पान मसाल्यावर बंदी घालण्यात आली आहे. ते खाणाऱ्या किंवा विकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच याची गोदामे सील केली जातील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. झारखंड सरकारने राज्यात गुटखा आणि पान मसाल्याच्या विक्री, साठवणूक आणि सेवनावर पूर्णपणे बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आपण तरुणांना वेदनेने मरताना पाहू शकत नाही, त्यामुळे हा कठेर निर्मय घेतल्याचे तेथील आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

या मोठ्या निर्णयाची घोषणा करताना राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. इरफान अन्सारी म्हणाले की, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निरोगी झारखंडचे स्वप्न साकार करण्यासाठी हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. ही बंदी केवळ एक नियम नाही तर झारखंडमधील तरुणांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी एक क्रांतिकारी उपक्रम आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे कोणत्याही किंमतीत खपवून घेतले जाणार नाही. गुटखा आणि पान मसाल्यामुळे कर्करोगासारखे घातक आजार झपाट्याने वाढत आहेत. आपले तरुण हळूहळू मृत्यूकडे वाटचाल करत आहेत आणि मी त्यांना माझ्या डोळ्यांसमोर मरताना पाहू शकत नाही. एक डॉक्टर असल्याने मला माहित आहे की हे विष शरीराला किती प्रमाणात नष्ट करू शकते. जेव्हा जनतेने मला आरोग्य मंत्री बनवले आहे, तेव्हा माझे पहिले कर्तव्य म्हणजे त्यांच्या जीवाचे रक्षण करणे.त्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गुटखा विकणाऱ्या, साठवणाऱ्या किंवा सेवन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. गुटखा माफिया आणि बेकायदेशीर व्यापाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवले जाईल. कोणत्याही दुकानात, गोदामात किंवा व्यक्तीमध्ये गुटखा आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई तर केली जाईलच, शिवाय गोदामही सील केले जाईल. या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना आरोग्य विभाग आणि प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

हा निर्णय संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श निर्माण करेल. त्यांनी अधिकाऱ्यांना आणि सर्वसामान्यांना हा निर्णय आव्हान म्हणून स्वीकारून झारखंड गुटखामुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “आम्हाला असा ट्रेंड सेट करायचा आहे जो इतर राज्यांनीही अनुसरावा आणि ही मोहीम देशभर चालेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.