
भरदिवसा भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी घडली. अनिल महातो उर्फ अनिल टायगर असे हत्या झालेल्या नेत्याचे नाव आहे. अनिय महातो हे माजी जिल्हा परिषद सदस्य होते. कांके चौकाजवळील चहाच्या टपरीवर उभे असतानाच महातो यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. यात महातो यांचा जागीच मृत्यू झाला. झारखंडमधील रांची येथील कांके चौकात ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच कांके पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. महातो यांच्या कुणी आणि कोणत्या कारणातून हल्ला केला याबाबत अद्याप समजले नाही. पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. या हत्येमुळे रांचीतील राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी कांके चौकात चक्काजाम केला.