Jharkhand: विधानसभेत भाजप आमदारांनी घातला गोंधळ; 18 आमदारांचं निलंबन, मार्शलद्वारे विधानसभेतून हटवले

झारखंडमधील भाजपच्या 18 आमदारांना 2 ऑगस्टच्या दुपारी 2 वाजेपर्यंत विधानसभेतून निलंबित करण्यात आले. गुरुवारी त्यांनी सभागृह सोडण्यास नकार दिल्याने मार्शलच्या मदतीने त्यांना सभागृहाच्या बाहेर नेण्यात आले.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास नकार दिल्याचं सांगत भाजपच्या आमदारांनी निषेध केला आणि त्यानंतर सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. भाजप सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातल्यानंतर अध्यक्ष रवींद्र नाथ महतो यांनी त्यांच्यावर कारवाई केली.

झारखंडमध्ये हुकूमशाही चालत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अमर बौरी यांनी केला.

अधिवेशन सुरू होण्यापूर्वी भाजपच्या आमदारांनी वेलमध्ये उतरून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केली. त्यांनी सभागृहाच्या वेलमध्ये काही कागदपत्रेही फाडली.

अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांमध्ये जोरदार वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले.

गोंधळाची परिस्थिती कायम राहिल्याने महतो यांनी भाजपच्या 18 आमदारांना निलंबित केले. निलंबनानंतरही त्यांनी सभागृह सोडण्यास नकार दिल्याने त्यांनी त्या विरोधी सदस्यांना हटवणाऱ्या मार्शलना बोलावले.

विधानसभा आचार समिती या प्रकरणाची चौकशी करून एका आठवड्यात अहवाल सादर करेल, असे सभापतींनी सांगितले.

त्यानंतर त्यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी 12.30 वाजेपर्यंत तहकूब केले.

भाजपच्या आमदारांनी विधानसभेच्या बाहेर पत्रकारांना सांगितले की, राज्यातील जेएमएमच्या नेतृत्वाखालील सरकारच्या इशाऱ्यावरून अध्यक्षांनी लोकशाहीची ‘हत्या’ केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

राज्यात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.

दुपारी 3 च्या सुमारास सभागृह तहकूब केल्यानंतरही त्यांनी वेलमधून हलण्यास नकार दिल्याने विरोधी भाजप आणि AJSU पक्षाच्या आमदारांना काल रात्री उशिरा सभागृहातून लॉबीमध्ये मार्शलने हाकलून लावले.

बुधवारी रात्री विधानसभेच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळील लॉबीच्या फरशीवर अनेक भाजप आमदार बेड कव्हर आणि ब्लँकेटवर झोपले होते.