बँकही सुरक्षित नाही? SBI च्या लॉकरमधून 81 लाखांचे दागिने झाले लंपास; नेमकं काय घडलं? वाचा…

आपले पैसे, दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तू सुक्षित राहावी म्हणून आपण बँकेत ठेवतो. मात्र बँक कर्मचारीच चोरी करत असतील, तर विश्वास ठेवावा कोणावर? असा प्रश्न उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीने उपस्थित केला आहे. उत्तर प्रदेशमधील जालौन जिल्ह्यातील ओराई येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) बँक लॉकरमधून एका व्यक्तीने 81 लाखांचे दागिने चोरी झाले आहेत. हे दागिने बँकेच्या कर्मचाऱ्यांनी चोरी केले असल्याचा आरोप या व्यक्तीने केला आहे.

आनंद स्वरूप श्रीवास्तव, असं पीडित व्यक्तीचे नाव असून त्यांनी बँक लॉकरमधून वडिलोपार्जित दागिने चोरीला गेल्याचा आरोप केला आहे. श्रीवास्तव सांगतात की, त्यांनी 13 ऑगस्ट 2024 रोजी बँकेत लॉकर उघडले होते, ज्यामध्ये सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने आणि तीन बॉक्समध्ये ठेवले होते. लॉकर बंद करत असताना बँकेचे अकाउंटंट प्रणय श्रीवास्तव आणि इतर कर्मचारी तिथे उपस्थित होते, असे त्यांनी सांगितले.

बँक मॅनेजर अंकित तिवारी, अकाउंटंट प्रणय श्रीवास्तव आणि इतर कर्मचाऱ्यांनी मिळून लॉकर फोडून दागिने चोरल्याचा आरोप आनंद स्वरूप श्रीवास्तव यांनी केला आहे. चोरीच्या दागिन्यांमध्ये चार सोन्याचे हार, 16 सोन्याच्या बांगड्या, 10 अंगठ्या, चांदीची अर्धी पेटी आणि 90 चांदीची नाणी आणि इतर दागिन्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितलं.

याप्रकरणी आनंद स्वरूप यांनी ओरई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस अधीक्षक उमेश पांडे यांनी सांगितले की, तक्रारीनुसार लॉकर फोडल्याची माहिती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दिली होती. श्रीवास्तव यांनी लॉकरमध्ये पाहिले असता दागिने गायब असल्याचे दिसून आले. याप्रकरणी बोलताना स्टेट बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक अमरपाल सिंग यांनी सांगितले की, बँकही या प्रकरणाचा तपास करत असून पोलिसांना पूर्ण सहकार्य केले जात आहे. तपासानंतर सत्य बाहेर येईल. सध्या पोलीस या प्रकरणातील तथ्य पडताळत आहेत.