कोल्हापूर उत्तर मतदारसंघात वाहनात सापडले 5 कोटी 58 लाखांचे दागिने; शिरोली जकात नाक्यावरील तपासणीत कारवाई

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात स्थिर सर्वेक्षण पथक्र क्र.1 कोल्हापूर- सांगली रस्ता (शिरोली जकात नाका) येथील तपासणी नाक्यावर एका वाहनात तब्बल 5 कोटी 58 लाखांचे दागिने आढळे आहेत. याबाबत कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात स्थिर सर्वेक्षण पथक्र क्र.1 कोल्हापूर- सांगली रस्ता (शिरोली जकात नाका) येथील तपासणी नाक्यावर पथक प्रमुखांमार्फत शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास रेडिअंट व्हॅल्युएबल लॉजिस्टीक लि. या कंपनीचे पिकअप वाहनाची तपाससणी करण्यात आली. त्यावेळी वाहनात 4 कोटी 3 लाख 3 हजार 71 रुपये इतक्या किंमतीचे 4949.21 ग्रॅम सोने, 11 लाख 51 हजार 861 रुपये किमतीची 6722.57 ग्रॅम चांदी, तर 1 कोटी 44 लाख 17 हजार 151 रुपये किमतीचे 884.71 ग्रॅम डायमंड असे एकूण 5 कोटी 58 लाख 72 हजार 85 रुपये किंमतीचे दागिने आढळून आले.

वाहनातील कर्मचाऱ्यांकडे केलेल्या चौकशीत हे दागिने चंदुकाका सराफ ॲण्ड सन्स लिमिटेड यांचे असल्याची माहिती मिळाली आहे. या दागिन्यांबाबत त्यांनी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी आयकर विभाग व वस्तु व सेवा कर विभागामार्फत सुरु आहे. पडताळणीनंतर संबंधित विभागामार्फत पुढील योग्य तो निर्णय घेण्यात येईल,असे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) संपत खिलारी यांनी सांगितले.

पथक क्र.1 कोल्हापूर-सांगली रस्ता (शिरोली जकात नाका),पथक क्र.2 शिये-बावडा रस्ता,छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना कमानी समोर व पथक क्र. 3 कोल्हापूर-रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी पुल येथे कार्यरत आहे. यामध्ये 1 नोव्हेंबर रोजी तीनही तपासणी नाक्यावर 2 हजार 72 वाहनांची तपासणी केली असता हे दागिने आढळून आले आहेत.या दागिन्यांची पडताळणी होईपर्यत या वाहनातील मौल्यवान धातू (दागिने) हे आयकर विभाग तथा वस्तू व सेवा कर विभागाचे अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांसमोर सिलबंद करुन जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आले आहेत.