जेईई-मेनचा निकाल जाहीर, 24 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल; महाराष्ट्रातील तिघांचा समावेश

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसह (आयआयटी) देशातील अनेक इंजिनीअरिंग शिक्षण संस्थांमधील प्रवेशाचे दार खुले करणाऱ्या जेईई-मेनचा (सेशन 2) निकाल शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. ही परीक्षा जानेवारी आणि एप्रिल अशा दोन सत्रात घेण्यात आली होती. त्यापैकी एप्रिल 2025 मध्ये झालेल्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेत 24 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल मिळविले आहेत. यात महाराष्ट्रातील आयुष चौधरी, सानिध्य सराफ आणि विषाद जैन यांचा समावेश आहे. 100 पर्सेंटाईल मिळविणाऱ्यांमध्ये सर्वाधिक सात विद्यार्थी राजस्थानचे आहेत.

जानेवारीमध्ये झालेल्या जेईईच्या पहिल्या सत्रामध्ये 14 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल मिळाले होते. एप्रिलमध्ये झालेल्या परीक्षेत देशभरातून 9 लाख 92 हजार 350 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी अडीच लाख विद्यार्थी जेईई-अ‍ॅडव्हान्स या पुढील परीक्षेकरिता पात्र ठरले आहेत. या परीक्षेतील यशावर त्यांचे आयआयटीतील प्रवेश निश्चित होतील.

वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झालेल्या या परीक्षेचा खुल्या गटाचा सरासरी कटऑफ 93.10 पर्सेंटाईल इतका आहे, तर ईडब्ल्यूएसचा 80.38, ओबीसीचा 79.43, एससीचा 61.15, एससीचा 47.90 पर्सेंटाईल इतका आहे. सर्वच दिव्यांग विद्यार्थी 3,950 अ‍ॅडव्हान्स-जेईईकरिता पात्र ठरले आहेत.

100 पर्सेंटाईल मिळविलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 21 विद्यार्थी खुल्या वर्गातील आहेत, तर ओबीसी, एससी, ईडब्ल्यूएस गटातील प्रत्येकी एका विद्यार्थ्याला 100 पर्सेंटाईल मिळाले आहेत, तर देवदत्ता माझी (पश्चिम बंगाल) आणि साई गुथीकोंडा (आंध्र प्रदेश) या दोन विद्यार्थिनींना 100 पर्सेंटाईल मिळविण्यात यश आले आहे.

जेईई-अ‍ॅडव्हान्ससाठी निवड झालेले गटनिहाय विद्यार्थी

खुला – 97,321
दिव्यांग – 3,950
ईडब्ल्यूएस – 25,009
ओबीसी – 67,614
एससी – 37,519
एसटी – 18,823