
आयआयटी, एनआयटीसह अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई मुख्य परीक्षा सत्र-2 चे वेळापत्रक राष्ट्रीय चाचणी संस्थे (एनटीए)कडून जाहीर करण्यात आले आहे. 2 ते 9 एप्रिल या कालावधीमध्ये ही परीक्षा होणार असून जेईई मुख्य परीक्षेसाठी जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी यंदा नोंदणी केलेली आहे.
राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) जेईई मुख्य परीक्षा सत्र-2 चे वेळापत्रक jeemain.nta.nic.in या आपल्या वेबसाईटवर अपलोड केलेले आहे. त्यानुसार, बीई/बी.टेक (पहिला पेपर) ची परीक्षा 2, 3, 4 आणि 7 एप्रिल रोजी दोन शिफ्टमध्ये होईल. सकाळची शिप्ट 9 ते 12 असून दुपारची शिफ्ट 3 ते 6 पर्यंत असणार आहे. तसेच 8 एप्रिल रोजी एक शिफ्टमध्ये (3 ते 6) परीक्षा होईल आणि बी. आर्कची परीक्षा 9 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 12.30 दरम्यान होईल. देशभरातली 284 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. तर विदेशातील 15 शहरांमध्येही ही परीक्षा होईल, असे एनटीएने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, एनटीएने 1 ते 25 फेब्रुवारी या काळात जेईई मुख्य परीक्षा सत्र-2 साठी अर्ज स्वीकारले आहेत. अर्ज भरताना ज्या विद्यार्थ्यांनी चूक केली त्यांना 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी चूक दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली होती.