एनडीएमध्ये धुसफूस! आसाममधील बीफ बॅनला JDU चा उघड विरोध, शेतकरी मुद्द्यांवरही वेगळी भूमिका

nitish-modi

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू नेते नितीश कुमार यांची मुंबईत भेट झाली. एकीकडे ही भेट होत असताना दुसरीकडे जेडीयूने भाजपला ‘राजधर्म’ आठवण करून दिली. आसाममधील हिमंता बिस्व सरमा सरकारने राज्यात बीफ बॅन म्हणजेच गोमांस बंदीला नितीश कुमार यांच्या जेडीयून विरोध केला आहे. यामुळे भाजपप्रणित एनडीएमधील धुसफूस समोर आली आहे.

आसाम सरकारचा बीफ बॅनचा निर्णय दुर्दैवी आहे. नागरिकांना खाण्या-पिण्याचे स्वातंत्र्य हवे. हा निर्णय राजधर्म विरोधात असून समजण्याच्या पलिकडे आहे. लोक काय खातात आणि कोणते कपडे घालतात? याच्याशी सरकारला काय देणं-घेणं आहे? असा सवाल जेडीयू प्रवक्ते राजीव रंजन यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरही वेगळी भूमिका

नितीश कुमार यांची जेडीयू वेळोवेळी भाजपला विरोध करत आली आहे. अलीकडेच वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरही जेडीयून तटस्थ भूमिका घेतली. तसेच यूपीमधील कावड यात्रेदरम्यान दुकानांवर नेमप्लेट लावण्याच्या योगी सरकारच्या निर्णयालाही विरोध केला होता. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं सरकार का पूर्ण करत नाही? असा प्रश्न राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी कृषीमंत्र्यांना केला होता. धनखड यांच्या वक्तव्याचे जेडीयून समर्थन केले होते.