
देशभरात सध्या वक्फ दुरुस्ती विधेयक चर्चेत आहे. बुधवारी लोकसबाहेत हे विधेयक पास झाले असून आज राज्यसभेत हे विधेयक मांडण्यात आलं आहे. जेडीयूने वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिला आहे. पक्षाच्या या पाठिंब्यावर मुस्लिम नेते नाराज असल्याची चर्चा आहे. जेडीयूचे एमएलसी गुलाम गौस आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गुलाम रसूल बलियावी यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. याचदरम्यान, जेडीयू नेते आणि विधानसभा निवडणुकीचे उमेदवार मोहम्मद कासिम यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची बातमी समोर येत आहे.
मोहम्मद कासिम यांनी आपला राजीनामा जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पाठवला आहे. राजीनाम्याचे कारण वक्फ दुरुस्ती विधेयकाला पक्षाने दिलेला पाठिंबा असल्याचे सांगितला जात आहे. नितीश कुमार याना पाठवलेल्या राजीनामा पत्रात मोहम्मद कासिम म्हणाले आहेत की, “आमच्यासारख्या लाखो हिंदुस्थानी मुस्लिमांना विश्वास होता की तुम्ही पूर्णपणे धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे ध्वजवाहक आहात, परंतु आता हा विश्वास तुटला आहे.”
मोहम्मद कासिम यांनी पुढं लिहिलं की, “लल्लन सिंग यांनी ज्या पद्धतीने या विधेयकाचे समर्थन केले त्याबद्दल मला खूप वाईट वाटते. वक्फ विधेयक हे आम्हा हिंदुस्थानी मुस्लिमांच्या विरोधात आहे. आम्ही हे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारू शकत नाही. हे विधेयक संविधानातील अनेक मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करते. या विधेयकाद्वारे हिंदुस्थानी मुस्लिमांचा अपमान केला जात आहे.”