
भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी कोटय़वधी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप करणाऱया याचिकेची उच्च न्यायालयाने सोमवारी गंभीर दखल घेतली व पोलिसांना फैलावर घेतले. कोरोना काळात मृत रुग्णांना जिवंत दाखवून घोटाळा केल्याचे प्रथमदर्शनी दिसतेय, त्याचे पुरावेही आहेत; मग गुन्हा दाखल करण्यासाठी कुणाची वाट बघताय, असा खडा सवाल करीत न्यायालयाने पोलिसांना निष्पक्ष तपास करण्याचे आदेश दिले.
सातारा येथील आमदार जयकुमार गोरे यांनी कोरोना काळात 200 हून अधिक मृत रुग्णांना जिवंत दाखवून सरकारी योजनांचा निधी लाटला. याबाबत पोलिसांनी गोरे, त्यांची पत्नी व इतर साथीदारांवर गुन्हा दाखल केलेला नाही. पोलीस त्यांची पाठराखण करताहेत, असा दावा याचिकाकर्त्या दीपक देशमुख यांनी केला आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी पोलिसांतर्फे अॅड. हितेन वेणेगावकर यांनी, तर याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. वैभव गायकवाड यांनी युक्तिवाद केला. खंडपीठाने उपलब्ध पुराव्यांची गंभीर दखल घेत पोलिसांना कारवाईबाबत कठोर शब्दांत जाब विचारला. त्यानंतर सरकारी वकिलांनी मृत रुग्णांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या प्राधिकरणाकडे सत्यता पडताळण्यासाठी वेळ मागितला. त्यानुसार खंडपीठाने तीन आठवडय़ांचा वेळ देत याचिकेवरील सुनावणी तोपर्यंत तहकूब केली.
जनतेच्या पैशांचा गैरव्यवहार गंभीर बाब
मेलेली माणसे जिवंत दाखवून सरकारी योजनांचे पैसे लाटले आहेत. जनतेच्या पैशांचा गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते. ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा प्रकरणात पोलिसांनी पक्षपाती वागू नये. दबावाखाली येऊन घोटाळेखोरांची पाठराखण कराल तर अजिबात खपवून घेणार नाही, असा सज्जड दम न्यायालयाने पोलिसांना दिला.
तपास अधिकाऱयाला कोर्टातच फुटला घाम
न्यायालयाच्या आदेशावरून वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे कोर्टात हजर राहिले होते. खंडपीठाने कठोर भूमिका घेताच ते कोर्टातच घामाघूम झाले. एसी सुरू असताना तुम्हाला एकटय़ालाच एवढा घाम का फुटलाय, असा सवाल न्यायालयाने सोनावणे यांना केला.
पोलिसांचे उत्तर कचऱ्याच्या डब्यात फेकण्यासारखे!
सातारा पोलिसांनी याचिकेवर सादर केलेल्या उत्तरावर न्यायालयाने असमाधान व्यक्त केले. तुमचे हे उत्तर कचऱयाच्या डब्यात फेकण्यासारखे आहे, अशी संतप्त टिप्पणी करीत न्यायालयाने पोलिसांचे कान उपटले.