अर्थसंकल्पातून देशातील आणि राज्यातील जनतेची घोर निराशा, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

केंद्रीय अर्थसंकल्पाने देशातील आणि राज्यातील जनतेची घोर निराशा केली. गरीब, महिला, तरुण, शेतकरी हे घटक गेल्या 10 वर्षांपासून सरकारकडून दुर्लक्षित ठेवले गेले होते. आज शेवटच्या अर्थसंकल्पात त्यांची आठवण आली असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला.

आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेत देशाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला. यावर जयंत पाटील यांनी पक्षाच्या मुख्य कार्यालयात माध्यमांना प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील आपल्या निवेदनात म्हणाले की सरकारने महागाई करण्यासाठी, बेरोजगारी दूर करण्यासाठी काही ठोस पावले उचलायला पाहिजे होती. सरकार म्हणतंय 25कोटी लोकांना दारिद्र्यातून काढले, 80कोटी लोकांना मोफत धान्य देत आहोत मग हंगर इंडेक्समध्ये 125 देशांमध्ये आपला देश 111व्या नंबरवर कसा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

2022 सालापर्यंत सर्वांना घरे देणार असे सरकारतर्फे सांगितले गेले होते आता म्हणतात 2047 पर्यंत देऊ. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे म्हणाले होते, आज शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. या अर्थसंकल्पातून करदाते आणि मध्यमवर्गीयांना काहीच मिळाले नाही. या अर्थसंकल्पात जीएसटी कमी केला असता तर महागाईवर मोठा परिणाम झाला असता, जनतेला दिलासा मिळाला असता पण तसे काहीच झाले नाही. देश सर्वच पातळीवर अधोगतीकडे जात असताना भ्रष्टाचारात मात्र आपण आगेकूच करत आहोत. आपण 85व्या नंबरवर होतो 93व्या नंबरवर आलो आहोत. देशावर 2014 आधी 54 लाख कोटी रुपये कर्ज होतो आज 205 लाख कोटीवर कर्ज पोहोचले आहे. हीच परिस्थिती राहिली तर देशाची परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली.