निवडणुका समोर ठेवून जातीय दरी वाढविण्यासाठी काही शक्ती कार्यरत – जयंत पाटील

विधानसभा निवडणुका डोळय़ापुढे ठेवून हिंदू-मुस्लिम दरी वाढवण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यादृष्टीने काही शक्ती कार्यरत झाल्या असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केला.

जयंत पाटील यांनी आपल्या संपर्क दौऱयात सातारा येथे राष्ट्रवादी भवनात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विशाळगडावर अतिक्रमण झाले आहे. त्याची बाजू कोणीही घेणार नाही. मात्र, ही अतिक्रमणे सरकारने पाऊस येण्यापूर्वीच काढायला हवी होती. आता भरपावसात ही कारवाई करणे मानवतावादी दृष्टिकोनातून योग्य वाटत नाही, अशी स्पष्ट भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.

कायम रयतेची काळजी घेतली पाहिजे, अशीच शिकवण छत्रपती शिवरायांनी दिली. तथापि, या सर्व प्रकरणादरम्यान गडावर जाऊ दिले नाही, म्हणून खाली येऊन एका समाजाला टार्गेट करून धार्मिक स्थळे उद्ध्वस्त करणे, त्यांच्या घरात घुसून लुटमार करणे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारात कुठे बसते, अशी खरमरीत टीका जयंत पाटील यांनी केली. बाहेरून कुठून तरी येऊन जे कोणी लोक गुंडागर्दी करत असतील तर त्यांच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे, अजामीनपात्र कलमे लावली पाहिजेत, त्यांना अटक केली पाहिजे, ज्यांनी त्यांना निमंत्रित केले आणि प्रवृत्त केले, त्यांनाही यात घेतले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

वाघनखे गुपचूप मागील दाराने साताऱयात आणणे गंभीर

n सातारच्या संग्रहालयात मांडण्यात येणार असलेल्या वाघनखांवरून वाद सुरू आहेत. आज ही वाघनखे कडक बंदोबस्तात आणून संग्रहालयात ठेवली गेली. त्यावर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले, ज्या वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा फाडला, ती वाघनखे साताऱयात जलमंदिरातच आहेत, असे इतिहासतज्ञ इंद्रजीत सावंत यांचे म्हणणे असल्याचे आपण ऐकले आहे. तथापि, लंडनच्या म्युझियममधून आणलेली वाघनखे हळूच गुपचूप मागील दाराने आणून येथील संग्रहालयात ठेवली हे गंभीर आहे. वाघनखे मागच्या दरवाजाने आणण्याचे कारण काय? वाघनखे सातारला वाजतगाजतच यायला हवी होती. आणि त्यांचे स्वागत करायला शुक्रवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी येण्यापेक्षा स्वतः छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केले असते, तर ते महाराष्ट्रातील जनतेला आवडले असते, असे जयंत पाटील म्हणाले. छत्रपती शिवरायांच्या तलवार, वाघनखे किंवा त्यांनी वापरलेली कोणतीही गोष्ट असो त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा लोकांना अभिमान आहे. देशातील जनता त्याकडे अभिमानाने बघते. पण ही वाघनखे मुंबईत कधी आली, साताऱयात कधी आली आणि संग्रहालयात कधी ठेवली, हे कोणालाच माहिती नाही, हे योग्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी व्यक्त केली.