पक्ष फोडणाऱ्यांना आणि गद्दारांना जागा दाखवा, जयंत पाटील यांची सडकून टीका

राज्यात निवडणूक प्रचाराचा चांगलाच धुरळा उडत आहे. सत्ताधाऱयांकडून पैशांचा वारेमाप खर्च केला जात आहे. परंतु, मतदार याला बळी पडणार नाहीत. राज्यात ज्यांनी पक्ष फोडले आणि ज्यांनी गद्दारी केली आहे अशा उमेदवारांना त्यांची जागा मतदारांनी दाखवून द्यावी, असे आवाहन शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विनायकराव पाटील यांच्या प्रचारार्थ चाकूर येथील सभेत ते बोलत होते.

पक्ष फोडणाऱयांना तर शिक्षा झालीच पाहिजे, मात्र पक्ष फोडल्यानंतर जे गद्दार फुटले, त्यांनाही त्यांची जागा दाखवायची आहे. या भागात तुम्ही ज्यांना निवडून दिले त्यांनी जनतेची, पवार साहेबांची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली आहे. सत्ता येते आणि जाते. पण असा फुटीरवादी आणि पक्ष बदलूपणा लोकांच्या लक्षात आला की ते पुन्हा त्या व्यक्तीवर विश्वास ठेवत नाहीत, असे पाटील म्हणाले.