
आपण महाविकास आघाडीमध्येच राहणार आणि महाविकास आघाडीचे काम निष्ठेने करणार, अशी स्पष्ट ग्वाही आज शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस व विधान परिषदेचे माजी आमदार जयंत पाटील यांनी दिली. शेकापच्या पेण येथील नवीन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, विधान परिषदेच्या अपयशाने खचून जाऊ नका. गेली पंचवीस वर्षे विधिमंडळात गोरगरीबांचे प्रश्न मांडण्याचे काम केले आहे. आगामी निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा. एकसंध राहून महाविकास आघाडीचे काम आपल्याला निष्ठेने करायचे आहे असेही म्हणाले. राज्यावरील कर्ज दोन लाख कोटींनी वाढलेले आहे. लाडका भाऊ, लाडकी बहीण योजनेला एक लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्याचा एकूण अर्थसंकल्प तीन लाख कोटींचा आहे. हा सर्व स्टंट निवडणुकीपूर्वी लोकांना आमिष दाखविण्यासाठी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
महायुतीचे अस्तित्व धोक्यात
राजकीय अस्थिरता व खोट्या आश्वासनांमुळे आगामी दिवसात महायुतीचे अस्तित्व राहील की नाही, अशी शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली. वारेमाप उधळपट्टी केल्याने एमएमआरडीएकडे पैसे शिल्लक नाहीत. त्यामुळे काम केलेल्या ठेकेदारांना बिले मिळतील की नाही याची शाश्वती नाही. सरकारकडे आर्थिक नियोजनाचा अभाव आहे. त्यामुळे ठेकेदारांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.