माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भारतरत्न द्या; जयंत पाटील यांची मागणी

हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि आर्थिक सुधारणांचे शिल्पकार डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगम बोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी केंद्र सरकारने राजघाटावर जागा नाकारली. दिल्लीच्या निघमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने संरक्षण विभागाला दिले होते.

काँग्रेससह अनेक पक्षांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. त्यांच्या पदानुसार त्यांचा सन्मान राखायला हवा. त्यांचे अंत्यसंस्कार आणि स्मारक यमुना नदीकिनारी राजघाटावरच व्हायला हवे, अशी भावना व्यक्त होत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही महत्त्वाची मागणी केली आहे.

मनमोहन सिंग यांच्या निधनाबाबत जंयत पाटील यांनी शोक व्यक्त केला. मनमोहन सिंग यांनी देशाला मुक्त अर्थव्यवस्थेकडे नेले. देशाच्या अर्थकारणाला दिशा देण्यात त्याची महत्त्वाची भूमिका आहे. देशाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या विकासाच्या आणि आर्थिक भूमिकेमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत देशाची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या या योगदानासाठी त्यांना भारतरत्न देण्याची गरज आहे. ते पुरस्कारासाठी पात्र आहे. तसेच सरकारने मनमोहन सिंग यांच्या स्मारकाच्या मागणीकडे दुर्लक्ष करू नये. देशाच्या पंतप्रधानांमध्ये त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.